विठ्ठल दर्शनाला 2 लाखांवर भाविक, पदस्पर्शासाठी लागला 7 तास वेळ:आषाढीनंतर मोठी एकादशी असल्याने भाविकांनी केली होती गर्दी
आषाढी यात्रा संपल्यानंतर आलेल्या पहिल्याच पुत्रदा एकादशीला पंढरपूरमध्ये तब्बल दोन लाखांहून अधिक वारकऱ्यांची गर्दी झालेली होती. दर्शन रांग गोपाळपूर रोड पर्यंत लांबली होती. त्यामुळे भाविकांना सहा ते आठ तासांची प्रतीक्षा करावी लागली. दरम्यान, पुत्रदा एकादशीनिमित्त भाविकांची एवढी गर्दी होईल याची शहर वाहतूक शाखेला बहुतेक कल्पना नसावी, ् शहरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून आले. आषाढी यात्रा ६ जुलै रोजी संपन्न झाली. त्यानंतर मंगळवारी ५ ऑगस्ट रोजी आषाढीनंतर आलेली पहिलीच एकादशी होती. पुत्रदा एकादशीनिमित्त सोलापूर जिल्ह्यातील तसेच जवळपासच्या भागातील शेकडो दिंड्या दोन दिवसांपासून दाखल झालेल्या होत्या. मंगळवारी पहाटेपासूनच चंद्रभागातीरी स्नानासाठी भाविकांची गर्दी उसळली होती. महाद्वार, श्री विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, दर्शनरांग अशा सर्वदूर भागात वारकऱ्यांची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसून आले. { पुत्रदा एकादशीनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतील, याची प्रशासनाला कल्पना नसावी. कारण शहर वाहतूक शाखेकडून वाहतुकीचे नियोजन करण्यात आलेले दिसले नाही. { सकाळी आठ वाजल्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत जागोजागी वाहतुकीची कोंडी झाल्याचे दिसून आले. सरगम चौक रेल्वे पूल, सावरकर चौक, भादुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, राजमाता अहिल्यादेवी स्मारक, संत गजानन महाराज मंदिर या भागात वाहतूक कोंडी झाली होती. { वारकरी दुचाकीवर दर्शनासाठी आल्याचे दिसून आले. या दुचाकी पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे हजारो दुचाकी वाळवंटात लावून दर्शनासाठी जात होते. त्यामुळे वाळवंटात गर्दी होती. दर्शन रांगेतही भाविकांना अडचणींचा सामना करावा लागला. दर्शनरांग ४ पत्राशेड ४५ हजार चौरस मीटर्सचा मंडप भरून गोपाळपूरमार्गाला लागली होती. रात्री ११ वाजल्यानंतर पहाटेपर्यंत विठ्ठल दर्शन बंद असल्याने रात्री ११ वाजता दर्शनरांगेत उभा राहिलेल्या भाविकांना सकाळी ११ वाजल्यानंतर विठ्ठल दर्शन मिळाले. दर्शनरांगेत पुरेशा प्रमाणात पाणी मिळाले नाही. तसेच अनेक ठिकाणाहून रांगेत घुसखोरी झाल्याचेही दिसून आले. दुपारनंतर भाविक परतीच्या मार्गाला लागले.

What's Your Reaction?






