कोंढूर वाळू घाटावर महसूल विभागाची कारवाई:वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त, दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव
कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील वाळू घाटावर महसूल विभागाच्या पथकाने दिलेल्या सरप्राइज तपासणीमध्ये वाळूने भरलेले ट्रॅक्टर आढळून आले आहे. पथकाने सदर ट्रॅक्टर जप्त केले असून या प्रकरणी पोलिस कारवाईसह दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदी, पूर्णा नदीच्या पात्रातून मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करून त्याची वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी तीनही उपविभागीय अधिकारी व पाच तहसीलदारांना वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्याच्या सुचना दिल्या. या शिवाय या पथकाने सरप्राइज भेटी देऊन तपासणी करावी व त्या ठिकाणी आढळून आलेल्या वाहनांवर कारवाईच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्यानुसार कळमनुरी तालुक्यात उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, तहसीलदार जीवककुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनासाठी सहा पथके कार्यरत करण्यात आली आहेत. यामध्ये मंडळ अधिकारी शिल्पा सरकटे, किरण पावडे, गजानंद तेलावार, ग्राम महसुल अधिकारी अशोक केंद्रेकर, नागेश कांबळे, मेघा राऊत, गणेश धाडवे, कमलकुमार यादव, सुनील भुक्तर, विनोद घुगे, अमोल पतंगे, पोलिस पोलिस भुरके यांच्या पथकाने बुधवारी ता. 6 रात्री दहा वाजण्याच्या सुमारास कोंढूर येथील वाळू घाटावर अचानक भेट देऊन तपासणी केली. यावेळी त्या ठिकाणी एका ट्रॅक्टरमध्ये वाळू भरलेली आढळून आली. या पथकाने चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर या पथकाने सदर ट्रॅक्टर जप्त करून कळमनुरी तहसील कार्यालयात आणले आहे. या प्रकरणी पोलिस कारवाई सह दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पथकाच्या सूत्रांनी सांगितले.

What's Your Reaction?






