विमानाद्वारे बिहारला जाण्याच्या तयारीत असलेले तिघे चोरटे जेरबंद:गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई, चितळे रस्त्यावरील चोरीचा गुन्हा उघड
अहिल्यानगर चितळे रोडवरील दुकानातून अडीच लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. पुणे विमानतळावरून ते बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असताना एलसीबीने सीआयएसएफच्या मदतीने ताब्यात घेतले. चोरट्यांनी १.९८ लाख रुपये एटीएमद्वारे बहिणीच्या खात्यात ऑनलाईन वर्ग केले आहेत. तसेच, एक आरोपी खुनाच्या गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेला असून, आरोपींनी पुण्यातही घरफोडी केल्याचे तपासात समोर आले आहे. मेहताब उर्फ अयान उर्फ जल्ला सफियाना शेख (वय २०, रा. एमआयडीसी कंपाऊंडजवळ, बौध्द नगर, पत्राशेड, पुणे), असफाक दिलशाद शेख (वय १९, रा. ज्योतीबानगर, काळेवाडी, पिंपरी कॉलनी, पुणे), निसार अली नजर मोहंमद (वय ३६, रा. तुलसीपुर, श्रावस्ती, उत्तरप्रदेश, हल्ली रा. वाघेश्वर नगर, वाघोली, ता. हवेली, जि. पुणे) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी चितळे रस्त्यावरील डी. चंद्रकांत दुकानाचे शटर उचकटून दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली अडीच लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांचे विशेष पथक तपास करत असताना तिघेही चोरटे पुणे विमानतळ येथून बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने पुणे विमानतळ येथून त्यांना ताब्यात घेतले. पुणे विमानतळावरील सीआयएसएफच्या निरीक्षक रुपाली ठोके, नियंत्रण कक्ष येथील दिपक वाघमारे यांनी पथकाला सहकार्य केले. असफाक दिलशाद शेख याने त्याचे बहिणीच्या बँक खात्यावर १ लाख ९८ हजार २०० रुपये एटीएम मशीनद्वारे ऑनलाईन वर्ग केल्याचे समोर आले आहे.

What's Your Reaction?






