लोकसभेच्या निवडणुकीत व्होट जिहादाचा प्रयोग:आम्ही आध्यात्मिक शक्तीने त्यांचा पराभव केला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे श्री संत सद्गुरू योगिराज गंगागिरीजी महाराज यांच्या 178 वा अखंड हरिनाम सप्ताह सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले होते. त्यानुसार देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झाले होते. यावेळी भाषण करताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. लोकसभेच्या वेळेस झालेल्या व्होट जिहादाला आम्ही आध्यात्मिक शक्तीने हरवले, अशी टीका फडणवीस यांनी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी जेव्हा मुंबईवरून विमानातून निघालो तेव्हा खाली समुद्र पाहताना विचार आला की किती मोठा हा समुद्र आहे. त्यावेळी आम्हाला कल्पना नव्हती की या ठिकाणी सप्ताहाला आल्यानंतर जनतेचा समुद्र पाहायला मिळतोय, ज्यावेळी खाली उतरलो त्यावेळी मी दाखवले की भाविकांचा अथांग समुद्र इथे आहे. आज रामगिरी महाराज अतिशय समर्थपणे गंगागिरी महाराजांची परंपरा चालवत आहेत. इथली शिस्त आणि भाविकता तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रसाद देताना जी तत्परता दिसते ही जगा वेगळे आहे. लोकसभा निवडणुकीत व्होट जिहाद झाला रामगिरी महाराजांचे मुख्यमंत्री बंगल्यावर निमंत्रण द्यायला मला आवडलेच असते, पण मी त्यांना निरोप दिला की आधी मला तुमच्या दारी येऊ द्या, शनिदेवाचे दर्शन घेऊ द्या, तुमचे दर्शन घेऊ द्या आणि या सर्व भाविकांचे दर्शन घेऊ द्या. मग तुम्ही मुंबईला या. याचे कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रात एक प्रयोग झाला आणि त्यातून व्होट जिहाद पाहायला मिळाला. राष्ट्रीय विचारला पराजित करण्यासाठी काही लोक एकत्रित आली. ज्यावेळेस हे षड्यंत्र लक्षात आले तेव्हा आम्ही महाराष्ट्रातील आध्यात्मिक शक्तीला आव्हान दिले आणि आम्ही परमपूज्य रामगिरी महाराज आणि येथील सर्व संतांना सांगितले की हे राजकीय आक्रमण नाही, हे आक्रमण आपल्या संस्कृतीवर आहे. आपला देश आणि आपला धर्म कायम राहिला पाहिजे काही मूठभर लोक एकत्र येऊन संतांच्या विचारांना, राष्ट्राच्या विचारांना पराजित करू शकतात अशी भावना तयार झाली तर मागच्या काळात आमच्या मंदिरांवर आक्रमण झाले, संस्कृतीवर आक्रमण झाले तसे मूक आक्रमण पुन्हा पाहायला मिळेल. सरकार येतील, सरकार जातील कोणतीच खुर्ची कायम राहत नसते. पण, आपला देश आणि आपला धर्म कायम राहिला पाहिजे. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले होते की स्वराज्य कशासाठी देव देश आणि धर्माकरता. मी आध्यात्मिक शक्तीचे साष्टांग दंडवत घालत प्रणाम करतो. संत शक्ती जेव्हा मैदानात उतरते तेव्हा सुपडा साफ करते आध्यात्मिक शक्तींनी उभ्या महाराष्ट्राला जागे केले आणि सांगितले की आपल्या संस्कृतीला वाचवायचे असेल तर जाती-भेद विसरून एकत्र यावे लागेल. जो विचार संतांनी दिला, प्रत्येक जण एकमेकांमध्ये पांडुरंग बघतो. आमचे रामगिरी महाराजांसह संत शक्ती जेव्हा मैदानात उतरली आणि तुम्ही परिणाम पाहिला. संत शक्ती जेव्हा मैदानात उतरते सगळ्यांचा सुपडा साफ होतो. त्याठिकाणी अभूतपूर्व असा विजय आम्हाला मिळाला. म्हणूनच मला या ठिकाणी येऊन जाहीरपणे या संत शक्तीचे आभार मानायचे होते. आता महाराज आपण कधीही या आपले स्वागत मुख्यमंत्री निवासस्थानी करायला आवडेल. सरला बेटाच्या विकास आराखड्याला मंजूरी देणार आमचे गिरीश भाऊ असतील किंवा विखे पाटील असतील, आपल्या सरला बेटाचे जे काही कार्य आहे ते कार्य पुढे नेण्याचे कार्य करत आहेत. जे भाविक येतात त्यांच्या व्यवस्था करण्याचे काम केले जात आहे. त्यातच शनीदेवगाव बंधरा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे कल्याण होणार आहे. त्यामुळे मी आज वचन देतो हा शनीदेव गाव बंधारा होणार म्हणजे होणार. सरला बेटाचा जो काही विकास आराखडा 109 कोटींचा तयार झालेला आहे, त्याला आम्ही मंजूरी देऊ. मराठवाड्यातील पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही सगळ्यात महत्त्वाचे काही असेल तर एकीकडे आज आपण शेतकऱ्यांना मोफत विजेची योजना केली आहे. येत्या काळात सोलर वीज देणार आहोत. आमच्या मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला आहे. पण आम्ही शपथ घेतो की मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. त्यांना दुष्काळमुक्त करणार आहोत. याची तयारी देखील आम्ही सुरू केली आहे. आमच्या लाडक्या बहीणींच्या पाठीशी आहोत, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तुम्ही आम्हाला पाच वर्षे निवडून दिले आहे, पुढच्या पाच वर्षांसाठी निवडून देताना तुम्हाला आनंदच होणार आहे. आध्यात्मिक शक्ती आपल्याला सुविचार देते, आध्यात्मिक शक्ती आपल्याकडून चांगले काम व्हावे अशी प्रेरणा देते. एकीकडे रामगिरी महाराजांची शक्ती आणि चराचरात वास करणारी गंगागिरी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीचे स्वरूप तुम्ही सगळी मंडळी या ठिकाणी आहात, तुमची शक्ती आणि आशीर्वाद प्राप्त करतो आणि आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आता या वेळेस आलो दर वर्षी येणार. आणि तुम्हाला माहीत आहेच की मी जे म्हणतो की मी पुन्हा येईन, तर मी येतोच. पुढच्या वेळेस एकनाथ शिंदे पण येतील आणि अजितदादांनाही घेऊन येऊ, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. लोकभावना आणि लोक आरोग्य यांची सांगड घालावी लागणार सभेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांना मुंबईतील कबुतर खान्यावरून झालेल्या जैन समाजाच्या आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना फडणवीस म्हणाले, एकीकडे आस्था आहे, लोकभावना आहे आणि दुसरीकडे लोक आरोग्य देखील आहे. या दोघांची सांगड घालावी लागेल. त्या दृष्टीने काय करता येईल, यावर मार्ग आम्ही काढत आहोत. तसेच इतक्या वर्षांची परंपरा खंडित होणार नाही, याचा देखील विचार करण्यात येणार आहे.

What's Your Reaction?






