दिव्या देशमुखला शासनाचे 3 कोटींचे बक्षीस:आम्ही बुद्धीबळ खेळतो, पण राजकारणात, सत्कार समारंभात मुख्यमंत्र्यांचे मिश्किल विधान
फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकावर आपले नाव कोरणाऱ्या नागपूरच्या दिव्या देशमुखचा राज्य सरकारने तब्बल 3 कोटी रुपयांचे बक्षीस देऊन गौरव केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हीही बुद्धीबळ खेळतो, पण राजकारणात, असे मिश्किल विधानही केले. नागपुरातील सुरेश भट सभागृहात महाराष्ट्र शासनाने ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिचा नागरी सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, अॅड. आशिष जयस्वाल, महाराष्ट्र बुद्धीबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या खेळाला सर्वत्र व्यावसायिक रूप येत आहे. महाराष्ट्र शासन क्रीडा क्षेत्राला महत्व देत असल्याने देश पातळीवरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक वरचा राहतो. शासनाकडून खेळाडूंना चांगले फिजिओथेरपीस्ट, न्यूट्रिशियनिस्ट, देशी- विदेशी प्रशिक्षकांसह इतरही सोय देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पूर्वी आंतराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळण्यास जाणाऱ्या खेळाडूंसोबत प्रशिक्षकाला जाण्याची परवानगी नव्हती. तिथे खेळाडू महत्वाचा असतोच. पण त्याच्यासोबत प्रशिक्षक जाणे व इतरही सोयीसुविधा उपलब्ध असणे महत्त्वाचे असते. इतर देशातील खेळाडूंकडे या सगळ्या सोयी राहत असल्याने आपल्या खेळाडूला अडचणी यायच्या. त्यामुळे शासनाने नियमांत बदल केले. तसेच खेळाडूंना आता मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीसही देणे सुरू केले. 3 कोटी रुपयांचा धनादेश दिला मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रत्यक्षात खेळाडूला विविध स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मोठा खर्च लागतो. या प्रकरणी कुटुंबाला काही मर्यादा असते. त्यामुळे पैसे नसलेल्या खेळाडूंची गैरसोय होत होती. काही प्रकरणांत त्यांना स्पर्धेतही सहभागी होता येत नव्हते. पण शासनाने ही अडचण दूर करण्यासाठी रोख स्वरुपातील बक्षीसाच्या रकमेत वाढ केली. यामुळे कोणताही होतकरू खेळाडू पैशांअभावी खेळापासून वंचित राहणार नाही. ते म्हणाले, दिव्या देशमुखला मागच्या स्पर्धेतील विजेतेपनानंतर शासनाने 1 कोटी रुपयांचे बक्षिस दिले होते. आता 3 कोटी रुपयांचा धनादेश दिला आहे. हा धनादेश नकली दिसत असल्याने आता तो वठणार काय? हे पैसे केव्हा मिळणार? हा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होईल. पण प्रत्यक्षात हा चेक उधारी नाही, तर दिव्याच्या खात्यात शासनाने एक दिवस अगोदरच शुक्रवारीच RTGS च्या माध्यमातून 3 कोटी रुपये वर्ग केले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. यावेळी दिव्या देशमुखनेही या सत्काराविषयी राज्य सरकारचे आभार मानले.

What's Your Reaction?






