मी स्वतःहून भाजप सोडली नाही:अंतर्गत राजकीय तडजोडींतर्गत मला राष्ट्रवादीत पाठवण्यात आले, प्रताप पाटील चिखलीकर यांचा दावा
मी स्वतःहून पक्ष सोडलेला नाही. भाजपच्या अंतर्गत राजकीय तडजोडीअंतर्गत मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाठवण्यात आले, असा थेट गौप्यस्फोट करत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. नांदेडमध्ये बोलताना आमदार चिखलीकरांनी म्हटले आहे की, मी ज्या पक्षात काम करतो, त्या पक्षाची वाढ आणि बळकटीकरण हीच माझी प्राथमिक जबाबदारी आहे. आणि त्यासाठी मी सातत्याने काम करत आहे. प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की, मी लहान माणूस आहे, पण माझ्यावर टीका करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात अनेकांना तयार करून ठेवलेले आहे. त्यांनी आपल्या कामगिरीची आठवण करून देताना सांगितले. मी चार माजी आमदार आणि खासदारांचा पक्षप्रवेश घडवून आणला. अजित पवार यांना तीन वेळा जिल्ह्यात आणले पण रिकाम्या हाताने पाठवले नाही. पक्ष बदलण्याचा निर्णय माझा नव्हता महायुतीमध्ये तडजोडीसाठी मला राष्ट्रवादीमध्ये पाठवण्यात आले. चव्हाणांना अप्रत्यक्ष टोला याच दरम्यान, चिखलीकर यांनी आपल्या फेरपक्षप्रवेशावरून अप्रत्यक्षपणे अशोक चव्हाणांवर निशाणा साधला. मी फेरप्रवेश दादांच्या (शरद पवार) उपस्थितीत केला नाही, असे म्हणत आमदार चिखलीकरांनी सूचक टोला लगावला आहे. तर 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानाची आठवण करुण देताना ते म्हणाले की, फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगितले होते की, अशोकराव लीडर नाहीत, डीलर आहेत. या विधानाचा संदर्भ देत त्यांनी पुन्हा एकदा अशोक चव्हाणांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमित शहा यांच्या उपस्थितीत माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी भाजपमध्ये पुनःप्रवेश केला. या प्रवेशावरूनही चिखलीकरांनी अप्रत्यक्षपणे टोला लगावत सांगितले की, काहींच्या फेरप्रवेशात थाटमाट असतो, पण माझ्या बाबतीत तसे नव्हते. मी काम करून दाखवतो, नुसता गाजावाजा करत नाही.

What's Your Reaction?






