टोकाई फाट्याजळ भीषण अपघात:गंभीर जखमी असलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा मृत्यू, मृतांची संख्या तीनवर
वसमत तालुक्यातील कोठारी ते टोकाई फाटा या मार्गावर भरधाव कार ट्रक खाली शिरल्याने झालेल्या अपघातातील गंभीर जखमी असलेल्या दोन वर्षाच्या बालकाचा शनिवारी ता ३१ नांदेड येथे रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यू झाला. या अपघातातील मृतांची संख्या आता तीन झाली आहे. कळमनुरी तालुक्यातील येहळेगाव गवळी व बोल्डा येथील एका कुटूंबातील काही जण ३० मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कारने (क्र एमएच १२ ईएम २५१५) यामधून बोल्डा येथून वसमतकडे निघाले होते. सदरील कार कोठारी ते टोकाई मार्गावर टोकाई फाटा शिवारात आली असताना कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने समोर उभ्या असलेला नादुरूस्त टिप्परच्या (क्र एमएच २५ यु १४५९) पाठीमागुन आत घुसली. त्यानंतर कार रस्त्याच्या खाली जाऊन तीन वेळा उलटली. या अपघातात कारचा चुराडा झाला. याअपघातामध्ये अमिर अतिक अहेमद सिद्दिकी (२३), उमरखान सुजातखान पठाण (४) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फारूख खान सुजातखान पठाण (२ वर्ष) याचा नांदेड येथे उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला. त्यामुळे या अपघातील मृतांची संख्या तीन वर पोहोचली आहे. दरम्यान या अपघातातील जखमी झालेल्या अतिक अहेमद रफीक अहेमद सिद्दिकी (५२) सुलताना बेगम अतिक अहेमद सिद्दिकी (४५), आरेफ अतिक अहेमद सिद्दिकी (२४), आलिया अतिक अहेमद सिद्दिकी (१५), सुजातखान मदरखान पठाण (४६), रेश्माबी सुजातखान पठाण (३५) वर्ष, चालक सय्यद इरशाद शाहरूख सय्यद इसाक (३६) या सात जणांवर कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलवले आहे. त्यांच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटने प्रकरणी कुरूंदा पोलिसात ३१ मे रोजी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

What's Your Reaction?






