तंत्रज्ञानातून उपाययोजना:द्राक्षबागेत चिखल; ड्रोनद्वारे फवारणीचा कल, एक एकरासाठी 800 रुपये खर्च, पाच मिनिटांत फवारणी
निफाड परिसरात मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून द्राक्षांंबरोबरच कांद्याचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यातच द्राक्षबागांच्या फुटी कोवळ्या असल्याने व पावसाची अवस्था बुरशीजन्य रोगांना अनुकूल असल्याने आंतरप्रवाही बुरशीनाशक औषधे फवारण्याची नामुष्की द्राक्ष उत्पादकांवर आली आहे. मात्र, द्राक्षबागेत चिखल असल्याने ट्रॅक्टरद्वारे फवारणी करत येत नाही. यामुळे यावर्षी द्राक्ष उत्पादकांनी ड्रोनद्वारे औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. दिवसाला ३५ ते ४० एकर क्षेत्रावर ड्रोनद्वारे फवारणी होऊ शकते. एक एकर फवारणीसाठी शेतकऱ्यांना ८०० रुपये खर्च येतो. मजुराने फवारणी केल्यास ५०० ते ६०० रुपये खर्च येतो. मजुरांकडून एकसारखी फवारणी होईलच हे सांगता येत नाही. ड्रोनमध्ये एक एकराचे औषध भरल्यानंतर न थांबता सात मिनिटांत फवारणी होते. यामुळे वेळेची बचत होते. ड्रोनद्वारे औषध फवारणी केल्याने पिकांवर अचूक आणि समान फवारणी होते. उत्पादन खर्चातही बचत होते. निफाड तालुक्यात प्रशिक्षित तीन ड्रोनचालक असून राजेंद्र मेमाणे (देवगाव), योगेश अष्टेकर (खेडलेझुंगे) व बापू मोरे (जळगाव) या शेतकऱ्यांकडे स्वतःचे ड्रोन आहेत. ^इफ्कोच्या माध्यमातून मिळालेल्या आयओटेक कंपनीच्या ड्रोनमुळे माझ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. आजपर्यंत आम्ही शेकडो एकर क्षेत्रावर फवारणी केली आहे. यंदा यातून चांगला रोजगार मिळत आहे. - बापू मोरे, ड्रोनचालक ^पावसामुळे द्राक्षबागेत चिखल झाला आहे. ट्रॅक्टरद्वारे बागेला फवारणी करणे अशक्य झाले आहे. ड्रोनने तीस एकर द्राक्षबागेवर फवारणी केली. एक एकरासाठी ४ ते ५ मिनिटे वेळ लागला. वेळ, श्रम व पैशाची बचत होऊ शकते. - वैकुंठ पाटील, कुंदेवाडी

What's Your Reaction?






