बागलाणला गटशिक्षणाधिकारी चार वर्षांपासून प्रभारीच:शाळांची दुरवस्था, 17 हजार विद्यार्थ्यांसाठी 777 शिक्षक, इमारतींचाही प्रश्न जटिल
बागलाण तालुक्यातील १७१ गावांतील १७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण सध्या २९६ प्राथमिक शाळांमधून सुरू आहे. प्राथमिक शिक्षणासाठी तब्बल ७७२ शिक्षक कार्यरत असूनही तालुक्याचा शैक्षणिक कारभार मागील चार वर्षांपासून प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या हाती आहे. तालुक्यातील ५५ मॉडेल शाळा आणि २१ केंद्र शाळांसाठी नऊ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना सध्या फक्त तीनच शिक्षण विस्तार अधिकारी कार्यरत आहेत. यापैकी चित्रा देवरे चार वर्षे प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळत आहेत. तालुक्यात खासगी शाळांचे पेव फुटले असले तरी सरकारी शाळांना विद्यार्थी संख्या वाढवण्याचे आव्हान कायम आहे. शासन दरवर्षी शिक्षणावर मोठा खर्च करत असले तरी बागलाणमध्ये खासगी शाळांची संख्या मोठी आहे. या तुलनेत अनेक ठिकाणी आधारभूत सुविधा कमी आहेत. काही ठिकाणी इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे. आगामी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या इमारतींच्या प्रश्नामुळे त्रास सहन करावा लागणार आहे. अनेक गावात ग्रामपंचायत, शालेय समिती किंवा लोकसहभागातून शाळांची दुरुस्ती आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले जात असले तरी अनेक गावांमध्ये अद्याप इमारतींच्या कमतरतेचा प्रश्न आहे. काही ठिकाणी शाळा इमारती पूर्णपणे जीर्ण झाल्याने नव्या इमारतींची नितांत गरज आहे. अशा स्थितीत कायमस्वरुपी गटशिक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती गरजेची आहे. शिक्षणमंत्री याच जिल्ह्यातील असले तरी जिल्ह्यात १५ पैकी १३ ठिकाणी प्रभारी गटशिक्षणाधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे, कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी केव्हा मिळणार हा प्रश्न शिक्षणप्रेमी आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. शासनाने नव्याने लागू केलेला सीबीएसई पॅटर्न यशस्वी करण्यासाठी व खासगी शाळांना टक्कर देण्यासाठी आणि सरकारी शाळांतील विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रभारी अधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी येत्या शैक्षणिक वर्षात असणार आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या २७७ शाळा आहेत. पहिली ते सातवीच्या १७ शाळा कार्यरत असल्या तरी त्या तुलनेत २९४ खासगी शाळाही विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. सरकारी शाळांमध्ये दर २२ विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक उपलब्ध आहे. पश्चिम भागातील करंजखेड या आदिवासी गावात १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच वर्गखोल्या आहेत. यामुळे शिक्षकांना अध्यापन करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.

What's Your Reaction?






