ध्येयावर निष्ठा ठेवा अन् यशस्वी व्हा:पाळधीच्या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात रविकिरण महाराज यांचा सल्ला
‘ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, संयम व शांतता अंगीकारा, विघ्नसंतोषी लोकांकडे दुर्लक्ष करा आणि यशस्वी व्हा’ हा त्रिसूत्री मंत्र खान्देश भूषण रविकिरण महाराज दोंडाईचेकर यांनी पाळधी येथील अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात दिला. तसेच तरुणांना उदात्त जीवनाचे मार्गदर्शन करत आदर्श विचारांची पेरणी केली. पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह सुरू आहे. सप्ताहाच्या पहिल्या दिवशी रविकिरण महाराजांचे कीर्तन झाले. यात त्यांनी अध्यात्म, समाज प्रबोधन आणि मनोरंजनाचा त्रिवेणी संगम भाविक भक्तांसमोर साकारला. तसेच जीवनात खूप अडथळे येतात, पण आपण दिव्याच्या प्रकाशासारखे सतत प्रज्वलित राहिले पाहिजे. आपल्या आई-वडिलांची सेवा करा, गुरूंचा सन्मान करा, व्यसनापासून दूर राहा आणि वयोवृद्धांशी सन्मानाने वागा असे सांगितले. आपल्या खास अहिराणी भाषेतील विनोदी शैलीत, उपमा, दृष्टांत आणि गोष्टी सांगत त्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कीर्तनाच्या समारोपप्रसंगी गावातील विविध मंडळांकडून रविकिरण महाराज यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महाराजांनी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, विक्रम पाटील व तरुण सहकाऱ्यांचे कौतुक केले. अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहात मार्गदर्शन करताना रविकिरण महाराज.

What's Your Reaction?






