मिश्र वस्तीतून जातअंताचा प्रयत्न:सामूहिक स्वयंपाकगृह, अभ्यासकेंद्रासह एकत्र राहण्याचा प्रस्ताव
जातीचा आग्रह आणि प्रथा केवळ सामाजिक अन्याय निर्माण करत नाहीत, तर देशाच्या आर्थिक आणि वैज्ञानिक प्रगतीत अडथळा ठरतात. या पार्श्वभूमीवर 'विचारवेध' संस्थेने जातअंताच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 'मिश्र वस्ती'ची संकल्पना पुढे राबवण्याचा निर्धार केला आहे,अशी माहिती संस्थेचे संचालक आनंद करंदीकर यांनी दिली.'विचारवेध' संमेलनानंतर पुण्यात आणि इतर आठ ठिकाणी झालेल्या स्थानिक चर्चांमधून स्पष्ट झाले की, जातीव्यवस्थेमुळे केवळ सामाजिक भेद नव्हे, तर आरोग्याच्या दृष्टीनेही गंभीर परिणाम होत आहेत. पोटजातीतील विवाहांमुळे आनुवंशिक दोष असलेली पिढी तयार होत असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले. त्यामुळे केवळ सामाजिक नव्हे, तर वैज्ञानिकदृष्ट्याही जातींचा अंत होणे अत्यावश्यक आहे. जातीच्या आग्रहाने फ्लॅट रिकामे राहतात,अशी खंत व्यक्त करत करंदीकर म्हणाले, शहरात जरी नव्या इमारती उभ्या राहत असल्या तरी त्यातही जातीचे भिंती पडत नाहीत. काहीजण जात न पाहता भाडे किंवा विक्री करण्यास तयार नसतात. परिणामी गरजू लोकांना घर मिळत नाही आणि घरमालकांचे आर्थिक नुकसान होते.या समस्येवर उपाय म्हणून 'मिश्र वस्ती' संकल्पनेचा आग्रह करीत करंदीकर म्हणाले, जातीअंताच्या दिशेने पावले उचलायची असतील तर एकत्र राहणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या जातींचे लोक एका वस्तीत राहिल्यास त्यांच्या संस्कृती, खाद्यपद्धती, विचार यांची ओळख होईल. एकमेकांबद्दलचा अविश्वास नाहीसा होईल. 'विचारवेध' च्या या पुढाकारात अशा मिश्र वस्त्यांमध्ये सामूहिक स्वयंपाकगृह, अभ्यासकेंद्र, मनोरंजन व्यवस्था असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सामूहिक स्वरूपामुळे घरांची किंमत कमी होईल, खर्च वाचेल आणि समाजात खरी 'सरमिसळ' साध्य होईल.करंदीकर यांनी सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विवेकी नागरिकांना आवाहन केले की, “ही फक्त सामाजिक नव्हे तर वैज्ञानिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यावश्यक चळवळ आहे. ‘विचारवेध’च्या मिश्र वस्ती उपक्रमात सहभागी व्हा. जातीच्या बंधनांमधून मुक्त होऊन नव्या माणुसकीच्या वसाहती घडवू या.

What's Your Reaction?






