मोर्शी शहराची स्वच्छता धोक्यात:21 वॉर्डांसाठी केवळ 4 कचरागाड्या; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
मोर्शी शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावताना ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु आर्श्चयाची बाब म्हणजे शहरातील संपूर्ण कचऱ्याच्या संकलनासाठी नगर परिषदेजवळ केवळ चारच कचरा गाड्या आहेत. कचरा गाड्या कमी असल्याने नागरिकांना कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात एक कचरा गाडी सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. प्रसंगी त्यासाठी अन्यथा जन आंदोलन उभे करण्याचा इशारासुद्धा दिला आहे. स्वच्छ भारत अभियान ही मोहीम संपूर्ण देशात राबवल्या जात आहे. स्वच्छतेकडून समृद्धीकडे या घोषवाक्य च्या आधारे मोर्शी शहरातही स्वच्छता अभियान राबवल्या जाते. सध्याच्या रचनेनुसार शहरात १० प्रभाग असून २१ सदस्यसंख्या आहे. पूर्वी प्रत्येक नगरसेवकामागे एक याप्रमाणे २१ गाड्या होत्या. त्यामुळे प्रत्येक घरातील कचरा संकलित केला जायचा. परंतु नवीन कंत्राट दिल्यापासून फक्त चारच कचरा गाड्यांद्वारे कचरा संकलित केला जात आहे. चारच गाड्या सुरू असल्याने प्रत्येक वॉर्डात दररोज कचरा गाडी जात नाही. पर्यायाने नागरिकांना आपल्या घरातील कच-याची विल्हेवाट लावताना अडचण निर्माण होत आहे. कचरा गाडी घरापर्यंत येत नसल्याने अनेक नागरिकांना उघड्यावरच कचरा टाकावा लागतो, त्यामुळे त्या ठिकाणी दुर्गंधी पसरते व नागरिकांना विविध आजाराला बळी पडावे लागते.मोर्शी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे स्वच्छतेकडे कोणतीही लक्ष नसल्याने कंत्राटदार आपल्या मर्जीप्रमाणे वागत आहे. वास्तविक कंत्राटदाराला कंत्राट देताना प्रत्येक घराजवळ कचरा गाडी नेऊन मजुराद्वारे कचरा संकलित केला जाईल, असा करार करण्यात आला आहे. परंतु वस्तुस्थिती अगदी विपरित आहे. त्यामुळे कचरा गाड्यांचा व मजुरांचा मोठा मलिदा हा कंत्राटदार फस्त करीत असल्याचे दिसून येते. याबाबत मोर्शी शहरातील अनेक नागरिकांनी तक्रारी सुद्धा केलेल्या आहे परंतु प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही. दरम्यान शहरात स्वच्छता हवी असल्यास प्रत्येक वॉर्डात एक कचरा गाडी फिरवणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोर्शी शहरात कचरा गाडी वाढवून कचरा संकलित करावा, अशी मागणी पुढे आली असून प्रसंगी त्यासाठी जनआंदोलन उभे करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष आप्पा रोडे, युवा सामाजिक कार्यकर्ते नीलेश रोडे यांच्यासह जागरूक नागरिकांनी दिला आहे.

What's Your Reaction?






