आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साद:म्हणाले - महाराष्ट्र हितासाठी येत असतील, तर त्यांना सोबत घेऊन लढू
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या पक्षांमध्ये संभाव्य युतीची चर्चा अलिकडच्या काही दिवसांपासून रंगू लागली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या सूचक वक्तव्यानंतर शिवसेना ठाकरे गट व मनसे यांच्यातील संभाव्य युतीच्या चर्चांनी आणखीनच जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र व युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही मनसेला सोबत येण्याची साद घातली आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षाबरोबर एकत्र येण्यास तयार आहोत. म्हणूनच आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला साद दिली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. यापूर्वीही आदित्य ठाकरे यांच्याबरोबरच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार अनिल परब, आमदार अंबादास दानवे, आमदार सुनील प्रभू यांनी देखील वारंवार युतीबाबत अनुकूलता दर्शवली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दुसऱ्या फळीतील काही नेते मात्र या युतीबाबत फारसे उत्साही दिसत नाहीत. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? आम्ही आमच्याकडून प्रतिसाद दिला आहे. आमची भावना व्यक्त केली आहे. मराठी माणूस व महाराष्ट्राच्या हितासाठी जो कोणी आमच्या बरोबर यायला तयार असेल आम्ही त्यांना बरोबर घेऊन महाराष्ट्र हितासाठी लढत राहू. काल परवा आमचे नेते दीपेश म्हात्रे व मनसेचे नेते राजू पाटील यांनी एकत्र येऊन आंदोलन केलं. हे त्याचंच उदाहरण आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. लोकांच्या मनात काय आहे हे आम्हाला माहिती आहे आणि आमचे मन देखील साफ आहे. जो कोणी नेता महाराष्ट्र हितासाठी आमच्याबरोबर यायला तयार असेल, जो पक्ष पुढे येत असेल, आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र येऊन लढू, असेही ते म्हणाले. सर्वांच्या मनातली बातमी लवकरच कळेल दुसरीकडे, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील यावर भाष्य केले आहे. युतीच्या चर्चेवर कोणीही मौन बाळगलेले नाही. स्वतः मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या मनातली इच्छा व्यक्त केली आहे, त्यांच्या सहकाऱ्यांनी नव्हे. राज ठाकरे यांच्या इच्छेवर त्यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी देखील अनुकूल भूमिका घेतली आहे. त्यानंतर आम्ही सर्वांनी देखील योग्य भूमिका घेतल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या मनातली बातमी तुम्हाला लवकरच कळेल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज ठाकरे प्रतिसाद देणार का? दरम्यान, आगामी मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही पक्ष आपली ताकद मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदे या महायुतीपुढे एक ताकदवान पर्याय उभा करायचा असेल, तर ठाकरे गट व मनसे यांच्यातील समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. परंतु, स्वतः आदित्य ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यास त्यांचे काका राज ठाकरे प्रतिसाद देणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

What's Your Reaction?






