अजित पवारांच्याच पक्षात गटबाजी:रोहित पवार यांचा दावा; दादांवर आरोप होत असताना बचावासाठी कुणीही पुढे येत नसल्याकडे बोट
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड गटबाजी असल्याचा आरोप केला आहे. आमच्या नव्हे तर अजित पवारांच्याच पक्षात मोठी गटबाजी आहे. त्यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या बचावासाठी कुणीही पुढे येत नाही, यावरून हे सिद्ध होते, असे ते म्हणालेत. गत काही महिन्यांपासून सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांकडून सातत्याने महाविकास आघाडीत फूट पडल्याचा आरोप होत आहे. पण आता आमदार रोहित पवार यांनी विरोधकांत नव्हे तर सत्ताधाऱ्यांतच दुही माजल्याचा आरोप केला आहे. विशेषतः अजित पवारांवर आरोप होत असताना त्यांच्या पक्षातील एकही नेता त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत नसल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच गटतट पडलेत रोहित पवार बुधवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, अजित पवार एकटेच आपल्या पक्षासाठी लढत आहेत. त्यांच्या पक्षाचे बाकीचे नेते काय करतात? त्यांच्या नेत्यांवर आरोप होत असताना हे नेते काहीच बोलत नाहीत, पण दुसऱ्यांवर आरोप होत असताना त्यांचे मोठमोठे बोलण्यासाठी पुढे येतात. मग याला काय म्हणायचे? त्यांच्या पक्षामध्येच अंतर्गत कुठेतरी गट पडलेत असे आपल्याला म्हणावे लागेल. जसे सत्ताधारी पक्षांच्या मित्रपक्षांमध्ये गट पडले आहेत, तसे महायुतीमध्येही गट पडलेत. अजित पवारांचा पक्ष एकनाथ शिंदेंच्या पक्षावरील आरोपांवर बोलत नाही. शिंदेंचा पक्ष अजितदादांच्या पक्षावर काही बोलत नाही. विशेषतः भाजप यात कुठेच दिसत नाही. भाजप मागे बसून केवळ तमाशा पाहण्याचे काम करतो. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये गट-तट पडले असल्याचे स्पष्ट होते. एकनाथ शिंदेंचा पाहा किंवा अजित पवारांचा पक्ष पाहा. त्यांना त्यांच्याच पक्षात काय सुरू आहे हे कळत नसेल तर आम्ही काय वक्तव्य करणार? असेही रोहित पवार यावेळी बोलताना म्हणाले. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणावर भाष्य उल्लेखनीय बाब म्हणजे सध्या राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकीकरणाचे वारे वाहत आहेत. शरद पवारांनी यासंबंधीचा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर सोपवला आहे. रोहित पवारांनी नुकतेच या मुद्यावर भाष्य केले होते. शरद पवार जेव्हा काही बोलतात तेव्हा त्याचा खूप खोल अर्थ असतो. कधीकधी त्यांच्या म्हणण्यापेक्षा काहीतरी उलट घडत असते. शरद पवार लवकरच महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतील. जेव्हा अजित पवारांचा गट वेगळा होऊन भाजपशी युती करत होता तेव्हा शरद पवारांच्या गटाने असे करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. कारण त्यांचे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत. आता जर शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात सामील होऊन भाजपशी युती करत असेल तर ते आश्चर्यकारक ठरेल, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा...

What's Your Reaction?






