बुलडाणा भाजपच्या शहर व तालुका अध्यक्षांची घोषणा:जिल्हाध्यक्ष शिंदे आज देतील नियुक्तीपत्र, स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या
भाजपने बुलडाणा जिल्ह्यातील शहर व तालुकाध्यक्षांची अखेर घोषणा केली असून, बुलडाणा शहराध्यक्ष म्हणून मंदार बाहेकर, तालुकाध्यक्ष सतीश भाकरे पाटील, मोताळा तालुकाध्यक्ष सचिन शेळके, तर मेहकर तालुकाध्यक्षपदी सारंग मळेकर यांची निवड करण्यात आली आहे.या सर्वांना आज भाजपचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. या नियुक्त्यांकडे जिल्ह्यातील राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे. विशेषतः शिंदे गटाला शह देण्यासाठी भाजपने या निवडीत गतिमानता दाखवली, असे बोलले जात आहे. महिनाभरापूर्वी जिल्ह्यातील गर्दे सभागृह येथे पक्षांतर्गत मतदान घेण्यात आले होते. मात्र त्यानंतर काही सदस्यांकडून आक्षेप नोंदविण्यात आले होते. त्यामुळे मूळ यादीची पडताळणी करण्यात आली. त्या प्रक्रियेनंतरच ही नियुक्त्यांची घोषणा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असल्याने भाजपने संघटनात्मक पातळीवर गती आणत शहर व तालुका स्तरावर नेतृत्व निश्चित केले आहे. काहीसा विलंब झाला असला तरी, अंतर्गत समन्वय साधत अखेर ही नावे निश्चित करण्यात आली आहेत. नुकत्याच निवडणुका लावण्याच्या न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुक तारीख कधी घोषित होते. याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे. त्यातच ही निवडणुक कार्यकर्त्यांसाठी स्वबळावर लढवायची की महायुतीतून लढवायची हे पक्षाचे ध्येय धोरण निश्चित झाले नाही. त्यामुळे अद्याप तरी स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत चर्चेला उधाण आले आहे. विजयराज शिंदे हे तीन वेळा आमदार राहिले असून शिवसेनेत असतांना जिल्हा प्रमुख पदाचा कारभारही त्यांनी बघितला आहे.

What's Your Reaction?






