थायलंडला पळण्याच्या तयारीत असताना आरोपी जेरबंद:सिम्बायोसिस प्रवेशाच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्याला कोलकाता विमानतळावर अटक
पुणे येथील सिम्बायोसीस या संस्थेचा लोगो असलेल्या इमारतीचा फोटो वापरुन तथा संस्थेचे बोगस वेबपेज तयार करून विद्यार्थ्यांना सिम्बायोसीसमध्ये प्रवेश देण्याचे आमिष दाखवणाऱ्या 3 भामट्यांविरोधात डेक्कन पोलिस ठाण्यात 2 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार अशी त्यांची नावे आहेत. ते सर्व पररराज्यातील आहेत. सदर गुन्हा दाखल झाल्यापासून दिव्या, आकाश यादव, कुणाल कुमार हे तीन आरोपी फरार झाले होते. अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी यांनी दोन ते तीन वेळा सदर आरोपींचा दिल्ली, हरीयाना या राज्यात जावून शोध घेतला परंतु ते पोलिसांच्या हातावर तुरी देवुन पळून जाण्यात यशस्वी होत होते. त्यानंतर तपास अधिकारी यांनी दाखल गुन्ह्यातील आरोपी यांचे लुक आऊट नोटीस जारी करुन त्यांचा दिल्ली, हरियाना तसेच महाराष्ट्रभर कसोशीने शोध सुरु केला होता. यातील आरोपी कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी, (वय-30 वर्षे मुळ राज्य-बिहार ) याचा पूर्व गुन्हेगारी इतिहासाची माहिती घेतली असता, त्याच्याविरोधात सन-2021 मध्ये सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपीने सत्र न्यायालय, पुणे येथे अटकपूर्व जामीन मिळण्याकरिता दिलेला अर्ज देखील न्यायालयाने फेटाळलेला होता. सदर गुन्ह्यातही तो अद्यापपर्यंत फरार असल्याची माहिती समोर आली. आरोपी हा फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार असल्याने त्याचा पुणे, मुंबई, दिल्ली येथे शोध घेणे कामी पोलीसांचे पथके तयार करण्यात आलेली होती. त्यानंतर आरोपी कुणालकुमार बिरेंद्रकुमार विद्यार्थी, हा त्याच्या पत्नीसह थायलंड देशात कोलकाता विमानतळ येथून जाणार असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेकडील एक पथक तात्काळ कोलकाता येथे जावून तेथील विमानतळावर सापळा रचून त्याला अटक केली. दाखल गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक उल्हास कदम अंमली पदार्थ विरोधी पथक एक गुन्हे शाखा हे करीत आहेत.

What's Your Reaction?






