"अताएसो'ची घटना ही लोकशाहीवर आधारित केल्याशिवाय थांबणार नाही:बैठक शेतकरी नेते सावंत यांचे आव्हान, विश्वस्त होण्याचा माझा आग्रह नाही- आ. लहामटे
अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची घटना ही मुख्य विश्वस्त दादासाहेब रूपवते यांनी तयार केली. घटना कालबाह्य सिद्ध झाल्यास त्यात बदल करण्याची तरतूदही त्यांनी ठेवली. अताएसोत नोकर भरती व बदल्यात पैसे खिशात घालण्याच्या मोहातून पदाधिकाऱ्यांत बेबंदशाही, एकाधिकारशाही निर्माण झाली. तीचे उच्चाटन लोकशाही मूल्यांवरच केले पाहिजे.शैक्षणिक संस्थेत मतभेद असावेत, मनभेद नसावेत. वयाचा विचार करता मला कमीपणा वाटला तरी चालेल पण अताएसोबाबद वैभव पिचड यांच्याशी चर्चेस मी तयार आहे. अताएसोच्या १९७२ च्या घटनेनुसार संस्था जनतेची आहे, याची शाश्वती मिळायलाच हवी. अताएसोचे सभासदत्व खुले करून शिथीलता निर्माण करावी. यापूढे अताएसोची घटना लोकशाहीवर आधारित केल्याशिवाय थांबणार नाही, असे आव्हानच अताएसोचे माजी अध्यक्ष व माजी स्विकृत विश्वस्त तथा शेतकरी नेते साथी दशरथ सावंत यांनी दिले. अकोले येथील महाराजा लॉन्सवर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी बोलावलेल्या बैठकीत साथी सावंत बोलत होते. अध्यक्षस्थानी शांताराम गजे होते. यावेळी आमदार डॉ. लहामटे म्हणाले, अताएसोवर २०२२ मध्ये आपण केलेले आंदोलन पत्रव्यवहार करूनच केले. आता त्याच विषयांवरून अताएसोचा कारभार पुन्हा ऐरणीवर आला. त्यांनी मला काल एक पत्र दिले. एका स्वीकृत विश्वस्ताने फोनवरून आजची बैठक रद्द करण्यास सांगितले. मी वैभव पिचड व अमित भांगरे यांना फोन करून निमंत्रित केले, पण त्यांनी फोन घेतले नाही. सुनिता भांगरे यांनी मात्र फोन घेतला. माजी स्विकृत विश्वस्त डॅा. बी.जी. बंगाळ यांचे पत्र अताएसो घटनेवर हरकत आहे. सभासद वा विश्वस्त होण्याचा माझा आग्रह नाही, पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेनुसार संस्था स्थापन केली असेल तर कामकाज लोकशाहीवर आधारितच हवे. ज्ञानेश्वर गायकर म्हणाले, मी संस्थेत सदस्य आहे. १९७२ ची घटना व १९७८ मधील घटनेतील बदल कायदेशीरपणे धर्मदायक न्यासाकडून मंजूर नाही. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आरिफ तांबोळी म्हणाले, अताएसोचे माजी अध्यक्ष जे.डी. आंबरे पाटील यांचे उत्तमोत्तम कार्य असताना खड्यासारखे दूर केले. अताएसो राजकारणाचा अड्डा बनता कामा नये. डॉ. माणिक शेवाळे म्हणाले, शिक्षणाची तळमळ असलेल्यांना विश्वस्त व कार्यकारिणीत स्थान द्यावे व पक्षीय राजकारण आणू नये. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी म्हणाले, अताएसोचे १० विद्यांलय आहेत. स्थानिक नागरिकांमधून एकही प्रतिनाधी अताएसोवर नाही, हे दुर्दैवी आहे. संस्थेत त्याग करणाऱ्यांवर अन्याय होतोय. सयाजीराव पोखरकर म्हणाले, मी १९९० चा सभासद आहे, मला पहिल्यांदाच या बैठकीस निमंत्रित केले. ही संस्था लोकशाही पद्धतीतून चालावी. शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञानावर आधारित केंद्र विकसित करण्याचे प्रयत्न अताएसोतून करावे. बैठकीत बोलताना शेतकरी नेते दशरथ सावंत समवेत व्यासपीठावर आमदार डॉ. किरण लहामटे, उत्कर्षा रूपवते आदी. शैक्षणिक विकासात्मक काम करण्यात स्वारस्य दादासाहेब रूपवते यांनी अनेक संस्थांची उभारणी केली. त्यांनी संस्था जनतेचीच राहील, याप्रमाणे कामकाज केले. अताएसोत संवादाचा मार्ग बंद असेल तर दबाव गट निर्माण करून आंदोलन व्हावे. मला अताएसोवर शैक्षणिक विकासात्मक काम करण्यात स्वारस्य आहे, असे वंचितच्या राज्य कार्याध्यक्ष उत्कर्षा रुपवते म्हणाल्या.

What's Your Reaction?






