मंत्री झाल्यावर जास्त बोलायचे नसते:राधाकृष्ण विखे पाटलांचा कृषिमंत्र्यांना सल्ला; कोकाटे मोकळ्या स्वभावाचे असल्याचा दावा
राज्याचे जलसंपदा मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या बोलघेवडेपणामुळे वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कमी बोलण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री झाल्यावर फार बोलायचे नसते. माणिकराव कोकाटे यांच्या मनात काही नसते. पण ते फटकळपणे बोलतात. त्यावरून वाद होतो, असे ते म्हणालेत. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर भाष्य करताना आता ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी त्यांनी कृषिमंत्रीपद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असल्याचे तिरकस विधान केले होते. त्यांच्या या दोन्ही विधानाचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटले. या पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांना सांभाळून व मोजके बोलण्याचा सल्ला दिला आहे. मंत्री झाल्यावर फार बोलायचे नसते मंत्री झाल्यावर जास्त बोलायचे नसते. माणिकराव कोकाटे हे मोकळ्या ढाकळ्या स्वभावाचे आहेत. त्यांच्या मनात काही नसते. पण ते फटकळपणे बोलतात. मित्र म्हणून मी त्यांना मोजके बोलण्याचा सल्ला देईन, असे राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. उल्लेखनीय बाब म्हणजे कृषिमंत्री कोकाटे यांनी आज स्वतःच्या मंत्रिपदाविषयी वादग्रस्त विधान केले. अजित पवारांनी मला कृषिमंत्रीपद दिले. पण ही ओसाड गावची पाटीलकी आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी, दोन दिवसांपूर्वीही त्यांनी असेच एक वादग्रस्त विधान केले होते. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्याला मोठा फटका बसला. जिल्ह्यातील कांदा, द्राक्षे व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, येथील शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. माणिकराव कोकाटे यांनी शुक्रवारी सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा वादग्रस्त सावल केला होता. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटले होते. कृषिमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. नेहमी वादग्रस्त विधानं करणारे मंत्री हे राज्याचे कृषिमंत्री आहेत की शेतकऱ्यांचे शत्रू आहेत, हेच समजत नाही. पावसामुळं झालेल्या नुकसानीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी ढेकळाचे पंचनामे करायचे का? असं संतप्त विधान करुन अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम हे कृषिमंत्री महाशय करत आहेत. राज्यभरात मे महिन्यात झालेल्या पावसाने ४० हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून सर्वाधिक फटका हा कांदा, फळबाग आणि भाजीपाला पिकांना बसला. कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच तब्बल ७ हजार हेक्टरपर्यंत नुकसान झालं असून हे कृषिमंत्र्यांनी बांधावर जाऊन बघावं. नुकसानीचे पंचनामे करताना जुने निकष काही असले तरी पावसामुळं नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई शेतकऱ्यांना द्यायची नाही का? मा. अजितदादा आपणच यामध्ये लक्ष घालण्याची आणि कायमच वादग्रस्त बोलणाऱ्या या मंत्र्याला संवेदनशीलतेने बोलण्याचा धडा देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले होते. हे ही वाचा... पुण्यात शिवसृष्टीच्या फलकावर लघुशंका:माथेफिरू व्यक्तीचे संतापजनक कृत्य, गुन्हा दाखल; शिवभक्तांचा पोलिस ठाण्यात संताप पुणे - पुण्यातील शिवसृष्टीच्या फलकावर एका माथेफिरू व्यक्तीने लघुशंका केल्याची संतापजनक घटना घडली आहे. काही शिवभक्तांनी या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे शिवभक्तांत संतापाची लाट पसरली आहे. वाचा सविस्तर

What's Your Reaction?






