लक्ष्मण हाकेंची भोकरमध्ये तोडपाणी:चव्हाणांच्या लेकीसाठी ओबीसी उमेदवार मागे घ्यायला लावला, अमोल मिटकरींकडून ऑडिओ क्लिप शेअर
महायुतीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असले तरी स्थानिक पातळी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये धुसफुस अजूनही सुरूच आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आता 'हीच हाक्याची औकाद' असे म्हणत अमोल मिटकरी यांनी लक्ष्मण हाके यांची एक ऑडिओ क्लिप समोर आणली आहे. राज्यात महायुतीचे तीनही प्रमुख पक्ष (भाजप, शिवसेना शिंदे गट, आणि राष्ट्रवादी अजित पवार गट) एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये तीव्र धुसफूस सुरूच आहे. सध्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यात सुरू असलेला वादावरून हे दिसून येत आहे. अमोल मिटकरी यांनी एक ऑडिओ क्लिप शेअर करत हाके यांनी विधानसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना उभे करून तोडपाणी केली. तसेच, अशोक चव्हाण यांच्या मुलीला निवडून आणण्यासाठी हाके यांनी दबाव टाकून ओबीसी उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावली असा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. अमोल मिटकरींनी त्यांच्या सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप शेअर करत म्हटले की, "सदर ऑडिओ ही भोकर मतदारसंघातील आहे. याच मतदारसंघात एका ओबीसी बांधवाचा राजकीय बळी देऊन हाक्याने आर्थिक देवाण-घेवाण केली आणि अर्ज मागे घ्यायला भाग पाडले. आता या मतदारसंघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे". काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये? ऑडिओ क्लिपमध्ये कुंटे यांनी कॉल केल्यावर, 'जय ओबीसी म्हणत, माझ्या पक्षाकडून नामदेव हिलवाड यांना एबी फॉर्म दिला होता. त्यांना उभं केलं होतं. पण त्यांनी विड्रॉल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लक्ष्मण हाके यांचा माझ्यावर दबाव आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभा लढवण्यापासून माघार घेतली. हा निर्णय घेतल्यावर हाके साहेबांशी बोलणे झाल्यावर फॉर्म मागे घेतला. पण हाके यांच्या म्हणण्यानुसार, आपण माघार घेतलेली नाही, आपण आपले उमेदवार उभे केले आहेत. त्यांची काही अडचण असेल, पण माझा संबंध नाही, मी कसा दबाव आणू शकतो. एवढेच बोलणे आटोपल्यावर हाकेंनी, मी बोलतो..म्हणत फोन कट केला. दरम्यान, दिव्य मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. 'ती ऑडिओ क्लिप माझीच, प्रहारच्या कुंटेंचा दावा दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील भोकरचे प्रहार पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड शेखर कुंटे यांनी ती ऑडिओ क्लिप आपलीच असल्याचा दावा केला आहे. मीच लक्ष्मण हाके यांना बोललो होतो, असा खुलासाही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत प्रहार पक्षाकडून नामदेव आईलवाड यांना भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी मागे घेतली. आईलवाड यांना विचारणा केली असता त्यांनी लक्ष्मण हाके यांचा दबाव असल्याचे सांगितले होते. त्यामुळे, मी लक्ष्मण हाके यांच्याशी बोलले होतो, असे ॲड शेखर कुंटेंनी सांगितले. उमेदवारी मागे घेतल्यानंतर तो उमेदवार सातत्याने लक्ष्मण हाके यांच्यासोबत होता. विधानसभा निवडणुकीत तो उमेदवार भाजपच्या उमेदवार श्रीजया चव्हाण यांच्या प्रचार सभेतही होता. त्यामुळे तो उमेदवार भाजपने आर्थिक तडजोड करून फोडला आणि त्यात लक्ष्मण हाके सुद्धा सहभागी आहेत असा आरोप ॲड कुंटे यांनी केला.

What's Your Reaction?






