सुधाकर बडगुजर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी:संजय राऊत यांच्या फोननंतर धडक कारवाई; नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? - बडगुजर
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते सुधाकर बडगुजर यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे नाशिकचे जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी आज एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेत खासदार संजय राऊत यांचा फोन आला आणि गायकवाड यांनी तत्काळ सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची घोषणा केली. ठाकरे गटाच्या या धडक कारवाईमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल बडगुजर यांनी या कारवाईवर भाष्य करताना उपस्थित केला आहे. सुधाकर बडगुजर गत काही दिवसांपासून ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यांनी परवाच नाशिक दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर त्यांनी काल एका पत्रकार परिषदेद्वारे महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह पक्षातील 10 ते 12 जण नाराज असल्याचे सूतोवाच केले होते. या प्रकरणी त्यांनी पक्ष संघटनेतील बदलांवर बोट ठेवले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ठाकरे गटाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. संजय राऊतांचा फोन अन् कारवाई सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नाशिक येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेला अपेक्षेनुसार बडगुजर गैरहजर राहिले. पण विलास शिंदे उपस्थित राहिले. ही पत्रकार परिषद सुरू असतानाच संजय राऊत यांचा दत्ता गायकवाड यांना फोन आला. त्यानंतर गायकवाड यांनी लगेचच सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा केली. ठाकरे गटाच्या या कारवाईनंतर सुधाकर बडगुजर कोणती भूमिका घेतात हे पहावे लागणार आहेत. ते सत्ताधारी भाजपमध्ये जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फडणवीस, गिरीश महाजनांवर टीका ठाकरे गटाचे नेते दत्ता गायकवाड यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सडकून टीका केली. गिरीश महाजन यांनी परवा शिवसेना अस्तित्वात राहणार नसल्याची बडबड केली. पण शिवसेनेमुळेच भाजप वाढला ही वस्तुस्थिती आहे. ज्या लोकांना जिल्ह्याला पालकमंत्री देता येत नाही, ते लोक शिवसेना संपवण्यास निघालेत. ही शिवसेना केव्हाच संपणार नाही. या पत्रकार परिषदेला कोअर कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. ते सर्व डबलरोलवाले आहेत का? भाजपने काही दिवसांपूर्वी सलीम कुत्ता प्रकरण बाहेर काढले. त्यानंतर आता स्वतः मुख्यमंत्री सुधाकर बडगुजर यांना भेट का देत आहेत? असा सवालही या प्रकरणी त्यांनी उपस्थित केला, असे ते म्हणाले. संजय राऊत यांनी दिले होते कारवाईचे संकेत संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी पत्रकारांशी बोलताना सुधाकर बडगुजर यांच्यावरील कारवाईचे संकेत दिले होते. एखाद-दुसऱ्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणून शिवसेनेत फाटाफूट होईल असे होत नाही. व्यक्ती म्हणजे शिवसेना नाही. त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याइतपत प्रतिष्ठा त्या पक्षाने दिलेली असते. आज पक्ष अडचणीत आहे. पण लोकांना लाभ हवे आहेत. त्या लाभासाठी ते पक्ष बदलत आहेत. एखाद्या व्यक्तीने एखाद्या महान विचाराने कुणी पक्ष सोडला असेल तर मला सांगा. सुधाकर बडगुजर म्हणजे शिवसेना नाही, असे ते म्हणाले होते. नाराजी व्यक्त करणे गुन्हा आहे का? - बडगुजर सुधाकर बडगुजर यांनी ठाकरे गटाच्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात नाराजी व्यक्त करणे गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला. या गुन्ह्याच्या शिक्षेचे हकालपट्टीमध्ये रुपांतर होत असेल तर त्याचे उत्तर मी काय देणार? मी कोणतेही पक्षविरोधी विधान केले नाही. माझे असे एखादे विधान मला दाखवून देण्यात यावे. पक्षात संघनात्मक बदल झाले तेव्हा मी नाराजी व्यक्त केली होती. ती मी काल उघडपणे बोलून दाखवली. हा गुन्हा असेल तर मी तो केला. त्याची शिक्षा या रुपात मिळत असेल तर ते मला मान्य आहे, असे ते म्हणाले. सुधाकर बडगुजर यांनी यावेळी या प्रकरणी उद्धव ठाकरे यांच्याशी कोणताही संवाद साधणार नसल्याचेही स्पष्ट केले. हकालपट्टीनंतर मी त्यांच्याशी (उद्धव ठाकरे) कोणता संवाद साधणार? कोर्टही एकतर्फी निर्णय देत नाही. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर निर्णय दिला जातो, असे ते आपली नाराजी व्यक्त करत म्हणाले. हे ही वाचा... गिरीश महाजन फडणवीसांचा सर्वात भ्रष्ट मंत्री:संजय राऊतांचा आरोप; महाजन यांच्या कार्यालयातील अभिषेक कौल नामक व्यक्तीचे घेतले नाव मुंबई - शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे फडणवीस सरकारमधील सर्वात भ्रष्ट मंत्री असल्याचा खळबळजनक आरोप केला. गिरीश महाजन यांच्या कार्यालयात अभिषेक कौल नामक ठेकेदार, बिल्डर आहे. तो पैशांचे सर्व व्यवहार करतो. त्याचा फोन आल्याशिवाय महाजन एकाही फाईलवर सही करत नाहीत, असे त्यांनी म्हटेल आहे. संजय राऊत यांच्या या आरोपामुळे महायुती सरकारमध्ये एकच खळबळ माजली असून, अभिषेक कौल कोण? असा सवाल केला जात आहे. वाचा सविस्तर

What's Your Reaction?






