जीवनसाथी डॉटकॉमवरील भेट महिलेला पडली महागात:लग्नाचे आमिष दाखवून तरुणाने केली 25 लाखांची फसवणूक
सायबर गुन्हेगार दिवसेंदिवस वेगवेगळी कारणे सांगत नागरिकांना दरराेज काेटयावधी रुपयांचा ऑनलाइन गंडा घालत आहे. अशाचप्रकारे पुण्यातील सहकारनगर परिसरात रहाणाऱ्या एका 44 वर्षीय महिलेने लग्नविषयक जीवनसाथी मेट्राेमनी या साईटवर नाेंदणी केली हाेती. त्याआधारे एका तरुणाने तिच्याशी ओळख करुन तिच्यासाेबत लग्न करणार असल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन करुन तिला शेअर मार्केट शिकवताे असे सांगून गुंतवणुकीच्या बहाण्याने 11 लाख 74 हजार रुपये विविध बँकखात्यावर घेतले. तसेच तिच्या नावावर 13 लाख 19 हजार रुपयांचे मनपुरम गाेल्ड कर्ज घेऊन तिची सुमारे 25 लाखांची ऑनलाइन आर्थिक फसवणुक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत सहकारनगर पोलिस ठाण्यात पिडित महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार जीवनसाथी प्राेफाईल हर्ष भागर्व याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार एप्रिल 2024 ते 27 मार्च 2025 यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर तक्रारदार महिला ही नाेकरी करत असून तिने लग्न करण्याचे उद्देशाने जीवनसाथी डाॅटकाॅम या साईटवर नाेंदणी केली हाेती. त्याआधारे तिचे प्राेफाईल पाहून आराेपी हर्ष भार्गव याने तिच्याशी संर्पक केला. तिच्यासाेबत लग्न करणार असल्याचे साागून तिच्या नावे डेलव्हंपमेंट बँक ऑफ सिंगापूर ब्रँच धर्मपेठ, नागपूर येथे ऑनलाइन बँक खाते सुरु केले. सदरचे बँक खात्यास स्वत:चा माेबाईल नंबर लिंक करुन, स्वत:च्या फायद्यासाठी वापरुन सदर बँक खात्यावर तक्रारदार यांना वेळाेवेळी वेगवेगळी कारणे सांगून सुमारे 11 लाख74 हजार 420 रुपये पाठविण्यास सांगण्यात आले. तसेच महिलेच्या नावावर वेळाेवेळी एकूण 13 लाख 19 हजार रुपयांचे मनपुरम गाेल्ड लाेन घेऊन सदरचे गाेल्ड लाेन परत न करता व महिलेशी लग्न देखील न करता तिला वेळाेवेळी विविध कारणे सांगून तिची आर्थिक फसवणुक करण्यात आली आहे. याबाबत सहकारनगर पोलिस पुढील तपास करत आहे.

What's Your Reaction?






