'माधुरी हत्तीणी' संदर्भातील वाद संपला:मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांनी घेतला खास पुढाकार, माजी खासदार राजू शेट्टींची माहिती
स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद जवळपास संपल्याची घोषणा केली आहे. माधुरी हत्तीणी संदर्भात जो वाद निर्माण झाला होता, तो जवळपास संपला आहे. वनतारा प्रशासन माधुरीवर जे उपचार वनतारामध्ये करणार होते, तेच उपचार आता त्यांनी नांदणी मठाच्या आसपास सेंटर उभारून करण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा प्राणी अभयारण्यात हलवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गत तिला वनतारामध्ये हलवण्यात आले होते. पण त्यानंतर कोल्हापुरात मोठा जनआक्रोश निर्माण झाला. हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून या निर्णयाचा विरोध केला. अखेर जनक्षोभापुढे नमते घेत सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून त्यावर तोडगा काढला. त्यानंतर वनताराची मालकी असणाऱ्या अंबानी कुटुंबीयांनी हा वाद हातावेगळा करण्यासाठी पुढाकार घेतला. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सकाळी माधुरी हत्तीणी संदर्भातील वाद जवळपास संपल्याची घोषणा केली. वनताराचे डॉक्टर नांदणीतच उपचार करतील राजू शेट्टी म्हणाले की, माधुरी हत्तीणी संदर्भात निर्माण झालेला वाद जवळपास संपला आहे. वनतारा प्रशासनाने नांदणी जैन मठाला वचन दिले आहे की, माधुरी हत्तीणीवर आम्ही वनतारामध्ये जे उपचार करणार होतो, तेच उपचार आम्ही नांदणी मठाच्या आसपास एक सेंटर उभे करून देणार आहोत. त्यावर मतैक्य झाले आहे. राहिला प्रश्न सुप्रीम कोर्टाचा, तर महाराष्ट्र सरकार, वनतारा प्रशासन व नांदणी मठ हे सर्वजण मिळून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात एक अर्ज दाखल करतील. त्याद्वारे नांदणीच्या माधुरी हत्तीला नांदणीतच चांगले वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली जाईल. त्यामुळे यासंबंधीचा वाद आता जवळपास संपला आहे. अनंत अंबानींनी मनाचा मोठेपणा दाखवला या प्रकरणी जनता मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरली होती. कारण, येथील जनतेचे माधुरी हत्तीणीवर खूप मोठे प्रेम होते. लोक तिला आपल्या कुटुंबातील सदस्य मानत होते. त्यामुळे तिचा दुरावा त्यांना सहन होत नव्हता. पण आता वाद संपुष्टात आला आहे. हा वाद निकाली काढण्यासाठी अंबानी कुटुंबाने पुढाकार घेतला. विशेषतः अनंत अंबानी यांनी मनाचा मोठेपणा दाखवत स्वतः मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. आम्हाला वाद नको आहे. आम्ही जनतेला विश्वासात घेऊन यावर तोडगा काढायचा आहे असे ते म्हणाले. त्यानुसार यावर तोडगा निघाला. मी त्याचे स्वागत करतो. अंबानी कुटुंबीयांचे मी आभार मानतो. माधुरीचा छळ केल्याचा आरोप सहन झाला नाही आम्ही जैन लोक आहोत. आमचा जगा व जगू द्या यावर विश्वास आहे. आम्हाला वेदना झाल्या होत्या. जीव, जंतू, प्राण्यावर आमचे फार प्रेम आहे. पेटाने आमच्यावर हत्तीणीचा छळ केल्याचा आरोप केला. हा आरोप आम्हाला सहन झाला नाही. त्यामुळे थोडासा संताप व्यक्त झाला. पण अंत भला तो सब भला या उक्तीनुसार सर्वकाही चांगले झाले. मी पुन्हा एकदा अंबानी कुटुंबीयांचे आभार मानतो, असेही राजू शेट्टी याविषयी बोलताना म्हणाले.

What's Your Reaction?






