धनंजय मुंडेंना 'सातपुडा' बंगला सोडवेना:मंत्री छगन भुजबळ शासकीय बंगल्याच्या प्रतिक्षेत, म्हणाले - कोणी राहत असल्यास कसे काढायचे?
परळीचे आमदार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप मंत्री असताना वास्तव्यास दिलेला सातपुडा बंगला सोडला नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना शासकीय निवासस्थानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. धनंजय मुंडे यांनी नियमानुसार 15 दिवसांच्या आत बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. पण साडेचार महिने उलटून गेले तरी मुंडे यांनी बंगला सोडलेला नाही. दरम्यान, सातपुडा बंगल्याच्या मुद्द्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन नेते आमने-सामने आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आले होते. या प्रकरणातील प्रमुख सूत्रधार वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांकडून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली होती. अखेर, प्रकरणाचा वाढता सामाजिक तणाव लक्षात घेता, धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतरही त्यांनी बंगला रिकामा न केल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. छगन भुजबळ दोन महिन्यांपासून प्रतिक्षेत धनंजय मुंडे यांनी सातपुडा बंगला सोडला नसल्याने आता बंगल्याचा ताबा घेणाऱ्या नव्या मंत्र्यांना अडचण निर्माण झाली आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. पण भुजबळ यांना आजही सातपुडा बंगला मिळण्याची प्रतीक्षा आहे. शासनाने 23 मे रोजी भुजबळ यांच्यासाठी सातपुडा बंगल्याचा अधिकृत आदेश काढला, पण धनंजय मुंडे यांनी बंगला रिकामा न केल्याने नवीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळ यांना अद्याप तिथे प्रवेश मिळालेला नाही. धनंजय मुंडेंना 42 लाखांचा दंड दरम्यान, सातपुडा बंगल्याचे क्षेत्रफळ 4 हजार 667 चौरस फूट आहे. नियमांनुसार, मंत्र्यांनी 15 दिवसांत बंगला सोडला नाही, तर त्यांना प्रति चौरस फूट 200 रुपये दंड आकारला जातो. यामुळे धनंजय मुंडे यांना महिन्याला 9 लाख 33 हजार रुपये दंड लागत असून, आता ही रक्कम 42 लाखांपर्यंत पोहोचली आहे. ही रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. छगन भुजबळ काय म्हणाले? मी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. सामान्य प्रशासन विभाग मंत्र्यांची ऑफिसेस कुठे असावीत आणि निवासस्थाने कुठे असावीत या संदर्भातली व्यवस्था पाहत असते. त्यांनी मला पंधरा दिवसांनी पत्र दिले की, तुमच्यासाठी अमुक-अमुक निवासस्थान देण्यात आलेले आहे. याचा अर्थ तुम्ही तिथे राहायला जावे. आता राहायला जावं असे म्हटल्यानंतर एखादं घर खाली असेल तरच आपण राहायला जाऊ शकतो. तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय बाहेर काढणार? धनंजय मुंडे हे आमचे सहकारी आहेत. मी त्यांना अजून याबद्दल एका शब्दानेही बोललेलो नाही. बंगल्याबाबत मुख्यमंत्री आणि इतर मंडळी काय चर्चा करतील आणि निर्णय घेतील, याची मला कल्पना नाही. अजितदादांनी देखील मी नवीन घरात गेलो की नाही, याबाबत विचारणा केली होती. घर खाली झाले जाईन, असे मी त्यांना सांगितले. धनंजय मुंडे आमच्या पक्षातील सहकारी असल्यामुळे ती त्यांच्याबद्दल काय तक्रार करणार? मी फार फार तर मुख्यमंत्र्यांना सांगेन. मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते पाहू, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. धनंजय मुंडे काय म्हणाले? याबद्दल धनंजय मुंडे यांनी नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे. याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

What's Your Reaction?






