धनंजय मुंडेंची मालमत्ता जप्त होणार का?:कोर्टात वाल्मीक कराडसह त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारी याचिका
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड व त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्यासंबंधीची एक याचिका बीडच्या विशेष मकोका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमुळे वाल्मीकसह धनंजय मुंडे यांची मालमत्ता जप्त होणार का? अशी चर्चा बीडच्या पंचक्रोशीत सुरू झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या संयुक्त मालमत्तेचे काही दस्तऐवज सार्वजनिक केले होते. त्यामुळे ही चर्चा सुरू झाली आहे हे विशेष. बीडच्या कोर्टात आज संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत सुदर्शन घुले व इतर आरोपींनी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. यावेळी वाल्मीक कराड व त्याच्या सहकाऱ्यांची मालमत्ता रद्द करण्यासंबंधी सरकारी वकिलांनी केलेल्या याचिकेवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. अंजली दमानिया यांनी काही दिवसांपू्र्वी एक पोस्ट केली होती. त्यात वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्या संयुक्त मालमत्तेंचे दस्तऐवज जाहीर केले होते. त्यामुळे नव्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने वाल्मीक कराडच्या मालमत्तेसह त्याच्या भागीदारीत असणाऱ्या मालत्तांवरही टाच आणण्याचे आदेश दिले, तर त्याचा थेट फटका धनंजय मुंडे यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाल्मीक कराड टोळीचा आर्थिक कणा मोडणार? उल्लेखनीय बाब म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड व इतर आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कायद्यात गंभीर गुन्ह्यांतील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची तरतूद आहे. सरकारी पक्षाने याच तरतुदीचा आधार घेत आरोपी व त्यांच्या सहकाऱ्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली आहे. कोर्टाने त्यांची ही मागणी मान्य केली, तर वाल्मीक कराड व त्याच्या कथित टोळीचा आर्थिक कणा मोडला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी कोर्टाच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काय केला होता अंजली दमानियांचा दावा दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 23 डिसेंबर 2024 रोजी वाल्मीक कराड व धनंजय मुंडे यांच्यातील आर्थिक भागीदारी स्पष्ट करताना काही दस्तऐवज सादर केले होते. धनंजय मुंडे व वाल्मीक कराड यांची एकत्र जमीन. या दोघांत आर्थिक सख्य किती आहे याचे हे धडधडीत पुरावे. कंपनी एकत्र व जमीनही एकत्र. जगमित्र शुगर्सचे 6 सातबारे मी डिजिटली डाऊनलोड केले. 3554 गुंठे जमीन (88 एकर 34 गुंठे), असे दमानिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. कोर्टाने वाल्मीक कराडला दिला होता झटका संतोष देशमुख हत्या प्रकरणाची गत 22 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यात विशेष कोर्टाने वाल्मीक कराडची दोषमुक्त करण्याची याचिका फेटाळून लावली होती. यामुळे या गुन्ह्यातून स्वतःची सुटका करून घेणाऱ्या वाल्मीक कराडचा पाय अधिकच खोलात गेला आहे. त्यानंतर आता या प्रकरणातील इतर आरोपींनीही दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली आहे. हे ही वाचा... हिंदीला मराठी भाषेच्या अगोदर ओळख मिळाली:शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा दावा; महाराष्ट्र तेव्हा अस्तित्वातही नसल्याचा दावा मुंबई - महाराष्ट्रात हिंदीच्या कथित सक्तीविरोधात रान पेटले असताना शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी यासंबंधी एक वादग्रस्त दावा करत या वादाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. हिंदी भाषेला मराठी भाषेच्या अगोदर ओळख मिळाली. त्यावेळी महाराष्ट्र अस्तित्वातही नव्हता, असे ते म्हणालेत. अविमुक्तेश्वरानंद यांनी काही दिवसांपूर्वीच ठाकरे कुटुंब हे बिहारमधून महाराष्ट्रात स्थलांतरीत झाल्याचा दावा केला होता हे विशेष. वाचा सविस्तर

What's Your Reaction?






