मिशन ॲडमिशन:कन्नडच्या जवाहर नवोदय विद्यालयात 11 वी सायन्सची प्रवेश प्रक्रिया सुरू, ऑनलाइनही करता येईल अर्ज, वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालायत 11 वीच्या विज्ञान शाखेसाठी प्रवेश सुरू झालेत. पात्र विद्यार्थ्यांकडून ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. सध्या तांत्रिक करणामुळे जुनी ऑनलाइन लिंक कार्यरत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या लिंकवर अर्ज भरावेत, असे आवाहन प्राचार्यांनी केले आहे. जवाहन नवोदय विद्यालयाच्या अकरावी प्रवेशासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2025, रविवारपर्यंत आहे. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. नवीन लिंक अशी... कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करता येतो. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे जुनी लिंक कार्यरत नाही. विद्यार्थ्यांची अडचण होऊ नये म्हणून नवीन लिंक पाठवण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी आता या https://forms.gle/cVa6UTpLDbyAJ69C8 नव्या लिंकवर क्लिक करून ऑनलाइन अर्ज भरावेत. माहितीसह PDF फॉर्म www.navodaya.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही प्रवेश फॉर्म रविवार सायंकाळी पाचपर्यंत भरता येतील, असे कळवण्यात आले आहे. संपूर्ण भरलेले अर्ज e-mail id jnvchh.sambhajinagar@gmail.com देखील पाठवू शकता. मात्र, मुदतीनंतर आलेल्या फॉर्म चा विचार केला जाणार नाही, असे कळवण्यात आले आहे. प्रवेशासाठीची पात्रता अशी... कन्नड येथील जवाहर नवोदय विद्यालयात 11 वीच्या विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याचा जन्म 01.06.2008 ते 31.07.2010 च्या दरम्यान झालेला असावा (दोन्ही तारखांसह). विद्यार्थी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 शासनमान्य शाळेतून उत्तीर्ण असावा. तसेच विज्ञान शाखेकरिता पात्र विद्यार्थी हा 60 % गुणांनी उत्तीर्ण असावा व विज्ञान तसेच गणित या विषयांत प्रत्येकी किमान 60 गुण असणे आवश्यक असतील. सहावी अर्जाच्या तारखेत वाढ जवाहर नवोदय विद्यालयातील इयत्ता सहावी प्रवेश प्रक्रिया 2026-27 साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 जुलै 2025 होती. मात्र, विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता आता त्यामध्ये 13 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. देशभरातील नवोदय विद्यालयांमध्ये सहावीत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना JNVST ही निवड परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा शनिवार, 13 डिसेंबर 2025 रोजी देशभरात एकाच दिवशी घेतली जाणार आहे. जवाहर नवोदय विद्यालयात मोफत शिक्षण, निवास, भोजन आणि विविध सहशालेय सुविधा मिळतात. ग्रामीण भागातील हुशार, परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, या उद्देशाने ही परीक्षा घेतली जाते. सूचना काळजीपूर्वक वाचा जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड (जि. छ. संभाजीनगर) येथील प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना व पालकांनाऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी प्रवेश सूचना पुस्तिका (प्रॉस्पेक्टस) काळजीपूर्वक वाचणे अत्यावश्यक आहे. त्यामध्ये पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्वाची माहिती नमूद केलेली आहे. "चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो, त्यामुळे अर्ज भरताना कोणतीही घाई न करता, माहिती अचूकपणे भरावी," असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालय, कन्नड येथील प्राचार्यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे.

What's Your Reaction?






