तयारी उत्सवाची:रक्षाबंधनसाठी आता डोरेमोन, मल्टी कलर, मिकी माऊस राख्या बाजारात; मागणी वाढली
प्रतिनिधी | दर्यापूर बहीण-भावातील अतूट नात्याला बळकटी देणारा रक्षाबंधन हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पारंपरिक सणाला आता काही प्रमाणात आधुनिकतेचा साज चढला आहे. त्यानिमित्ताने विविध राख्यांचा ट्रेण्ड बाजारात रूढ झाला आहे. आकर्षक राख्यांनी बाजारपेठ सजली आहे. रविवार सुटीचा दिवस असल्याने राखी खरेदीसाठी दर्यापूर बाजारात बहिणींची गर्दी वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. काळानुरूप राख्यांसाठी आता पाच-दहा रुपये खर्च करण्याची मानसीकता बदलून डिझायनर राख्यांसाठी शंभर रुपयांपासून पुढे राख्या मिळत आहे. दुसरीकडे खर्च करायला महिला ग्राहक तयार आहेत. पारंपरिक राख्यांसोबतच सध्या मल्टि कलर लेसेस, डोरेमोनसह विविध कार्टून्स, डायमंड वर्क, फॅन्सी, मोती, स्टोन, गोंड्याच्या राख्या, अशा १० रुपयापासून एक हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. सहा दिवसावर रक्षाबंधन हा सण आला असून दर्यापूर शहरात बसस्थानक चौक, गांधी चौक, जयस्तंभ चौक, बाभळी, मरिमाता मंदीर चौक आदी ठिकठिकाणी राखी विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली आहेत. भावासाठी घरगुती हँडमेड राखी अधिक लक्षवेधी धावपळीच्या युगात प्रत्येक वस्तू रेडिमेड स्वरुपात उपलब्ध आहे. परंतु, आपल्या लाडक्या भावासाठी वेळात वेळ काढून स्वतःच्या हाताने राखी तयार करण्याचे समाधान वेगळेच असते. त्यामुळे भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी काही बहिणी स्वतः आपल्या हाताने राखी तयार करण्याला पसंती देत आहेत. घरी उपलब्ध असलेल्या साधनांमधूनच आकर्षक व पर्यावरणपूरक राख्या तयार करण्यासाठी त्या प्राधान्य देत आहेत.

What's Your Reaction?






