मनोभावे भक्ती केल्यास भगवंत चराचरात:मानूर येथे पाचवे पुष्प गुंफताना अंजलीताई शिंदे यांचा उपदेश
परमार्थ करतांना भगवंताचे रुप, स्वरूप, कार्य, अभंग समजून घेतले आणि त्याला शरण जाऊन हरिनामाचा जप केला. मनोभावे भक्ती केली की तो चराचरात असल्याचे समजेल. कुठली ना कुठली शक्ती आहे, जी शक्ती जग चालवते आहे. याची महती आणि माहिती कीर्तन सप्ताहातून श्रोत्यांना मिळत असते. मनुष्याने जीवन जगताना काय करावे व काय करू नये याचे संस्कार कीर्तनातून होत असल्याचा उपदेश अंजलीताई शिंदे यांनी केला. मार्कंडेश्वर भजनी मंडळ आणि मानूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कीर्तन सप्ताहात दादाजी जगन्नाथ बोरसे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पाचवे पुष्प शिंदे यांनी गुंफले. ईश्वराचे खरे स्वरुप त्याचा स्वभाव दर्शवते. संत तुकाराम म्हणतात की, ईश्वराला रुप नाही. तो सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही अवस्थांच्या पलीकडे आहे. अभंग या काव्यप्रकारातून संतांनी परमेश्वराचे स्वरुप कार्य व तत्वज्ञान व्यक्त करण्यासाठी वापरला आहे. हिंदू धर्मात तुळस महत्त्वाची आहे. तुळसीमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. जे रोगांना दूर ठेवण्यास मदत करतात यामुळे गळ्यात तुळशीची माळ असावी. कीर्तनाच्या माध्यमातून भगवंताचे गुण व पराक्रम सांगून लोकांना भक्ती व जनजागृतीच्या पलिकडे नेले जाते. जो श्रवण, स्मरण, नामसंकीर्तन, गुणांचे गायन आणि स्वरुपवर्णनासारख्या घटकांचा संगम साधतो. कीर्तनाच्या सेवेकरी सरस्वती बोरसे यांनी अंजलीताई शिंदे यांचा सन्मान केला. गायनाचार्य अक्षय वाघ, सोपान खैरनार, मृदुंगाचार्य ओंकार जाधव यांनीअभंग सादर केले. कीर्तन संस्कृतीचा अविभाज्य भाग कीर्तन हे महाराष्ट्रातील सांस्कृतिक इतिहासाचा एक अविभाज्य आणि मौल्यवान भाग आहे. अनेक संतांनी आणि समाजसुधारकांनी किर्तनाचा उपयोग समाज सुधारण्यासाठी आणि घडवण्यासाठी आणि लोकांना योग्य मार्गावर आणण्यासाठी केला. कीर्तनाच्या माध्यमातून पौराणिकतेपासून ते राष्ट्रीयत्वासह विविध विषयांचा प्रसार होतो. यामुळे देश, धर्म, संस्कृती आणि संस्कार बळकट होत आहेत. यामुळे गावोगावी वर्षातून एकदा किर्तन सप्ताह आणि रोज हरिपाठ सुरू व्हावेत.

What's Your Reaction?






