लघु उद्योग भारती यांच्या कार्यक्रमात सौरभ गाडगीळ यांचा सल्ला:नोकरीपेक्षा धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा, तरुणांमध्ये उद्योजकीय मानसिकता आवश्यक
व्यावसायिक होण्यासाठी पहिल्यांदा नोकरी करून अनुभव घेणे गरजेचे नाही. आपल्यासमोर विविध संधी आज उपलब्ध आहेत, याचा उपयोग करून आपण थेट व्यवसायामध्ये उतरू शकतो. नोकरी करून पारंपारिक विचारधारा पुढे नेण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन व्यावसायिक व्हा, असा सल्ला देतानाच तरुणांमध्ये उद्योजक होण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असे मत पीएनजी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केले. मएसो सीनियर कॉलेज पुणे, डिक्की नेक्स्टजेन आणि लघु उद्योग भारती यांच्यातर्फे उद्यमी संवाद या मुलाखतपर कार्यक्रमामध्ये ३०० हून अधिक विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. सौरभ गाडगीळ बोलत होते. मएसो प्रशासकीय मंडळ सदस्य सचिन कुलकर्णी, मएसो सिनियर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, उपप्राचार्या डॉ.पूनम रावत, अक्षय बिक्कड, स्टार्टअप इनोव्हेशन सेल समन्वयक प्रा. निलेश यादव यावेळी उपस्थित होते. डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले, काळानुसार व्यवसायात जर बदल घडले नाही तर अनेक मोठ्या कंपन्या आज नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे काळानुसार बदलणे हे व्यवसायामध्येही गरजेचे आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये तुम्ही कोणत्याही क्षणी स्पर्धेच्या बाहेर फेकले जाऊ शकता. त्यामुळे ग्राहकांशी संवाद कायम ठेवणे हे गरजेचे असते. त्यामुळेच आपला व्यवसाय हा काळानुरूप टिकू शकतो आणि ग्राहकांच्या पसंतीला उतरू शकतो. आज जवळजवळ २०० वर्षे झाली तरीही पीएनजी ज्वेलर्स हा केवळ मार्केटमध्येच नव्हे तर ग्राहकांच्या मनामध्ये घर करून राहिलेला आहे असेही गाडगीळ यांनी यावेळी सांगितले. मराठी उद्योजक कोणत्याही बाबतीत मागे नाही परंतु अनेक वर्षांपासून मराठी माणसांमध्ये तुम्ही नोकरी चांगल्या प्रकारे करू शकता उद्योग करू नका, असा विचार रुजवण्यात आला आहे. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये स्थिरस्थावर होणे पहिल्यांदा पसंत करतो, परंतु गेल्या काही वर्षांपासून मराठी माणूसही उद्योग क्षेत्रामध्ये भरारी घेत आहे त्यासाठी मराठी तरुणांमध्ये सर्वप्रथम उद्योजक निर्माण करण्याची मानसिकता निर्माण करणे गरजेचे आहे, असेही डॉ. सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.

What's Your Reaction?






