अखेर ठाकरे बंधूंची युती झालीच!:मुंबई पालिकेआधी मनसे आणि शिवसेना एकत्र, बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक लढवणार
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचा रणसंग्राम अद्याप सुरू झालेला नसतानाच, मुंबईतील बेस्ट उपक्रमाच्या निवडणुकीत मात्र एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) युती करत बेस्ट कामगार पतपेढीची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीला स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. बेस्ट उपक्रमाच्या कामगार पतपेढीची निवडणूक येत्या 18 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. कामगार संघटनांच्या सत्तेसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक मानली जाते, कारण याच निवडणुकीच्या माध्यमातून बेस्टमधील संघटनांचे वजन ठरते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोघांनी एकत्र येत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निवडणुकीचे राजकीय परिमाण वाढले आहे. राजकीय संघर्षाऐवजी एकजूट गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या मार्गांनी चाललेल्या ठाकरे बंधूंनी यावेळी ‘मराठीसाठी एकत्र’ येण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येते. बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यात मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. अखेर उच्चपातळीवर निर्णय घेऊन दोन्ही संघटनांनी बेस्ट पतपेढीची निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंतांचे पत्रक बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले की, बेस्ट उपक्रमाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक सोमवार दि 18 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर झालेली आहे. सोसायटी निवडणुकीत ज्या पॅनल ची सत्ता असते त्या कामगार संघटना बेस्ट उपक्रमात बलवान समजल्या जातात. महाराष्ट्रात सद्या ठाकरे ब्रँड चर्चेत आहे. मराठी च्या मुद्द्यावर एकत्र आलेले आणि मराठी अस्मितेचा स्वाभिमान असलेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यास महापालिका च काय महाराष्ट्रात सरकार स्थापन करू शकतील अशी सर्वसामान्य लोकांची धारणा आहे. बेस्टचे बहुतांश कामगार पुढारी, युनियन चे पदाधिकारी बेस्ट च्या बाहेर शिवसैनिक आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून परिचित आहेत. तर कित्येक पदाधिकारी दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आहेत. बेस्ट पतपेढी ची निवडणूक म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची नांदी आहे. त्यामुळे बेस्ट मधील ठाकरे बंधू च्या युती ला फार मोठे महत्व प्राप्त झाले आहे. बेस्ट कामगार सेना अध्यक्ष सुहास सामंत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुबंई अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्यामध्ये या युती बाबत मागील काही दिवसांपासून युती बाबत चर्चा सुरु होती. वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन्ही नेत्यांनी निर्णय घेतल्याप्रमाणे आता बेस्टमधील प्रत्येक लढाई आता बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कर्मचारी सेना एकत्रित लढणार आहे. मराठी माणसाचा रोजगार म्हणजे बेस्ट उपक्रम पण विद्यमान सरकार मधील पुढारी आणि त्यांची धोरण काही उद्योगपती ना बेस्ट आंदण देण्यासाठी असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे बेस्टमधील मराठी कामगार हद्दपार होतं चालला आहे. त्यामुळे बेस्ट मध्ये ठाकरे ब्रँड एकत्र येणं म्हणजे मराठी माणसाची एकजूट मोठया ताकदीने उभी राहणार यांत शंका नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या काळात ग्रॅज्युएटी साठी मुंबई महापलिका प्रशासन नियमित मदत करत होतं, पण जून 2022 नंतर महायुती सरकार भाजप सतेत आल्या नंतर बेस्ट मधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅज्युएटी वाढत चालली आहे. बेस्टचा स्व मालकीचा बसताफा कमी होत चालला आहे नवीन नोकर भरती नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. बेस्ट पतपेढी मध्ये सध्या उद्धव ठाकरे यांच्या बेस्ट कामगार सेनेची सत्ता आहे. मागील नऊ वर्षाच्या कालावधीत बेस्ट कामगार सेनेच्या संचालक मंडळाने केलेल्या कामगार कल्याणकारी कामामुळं कामगारांचा प्रचाराला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आल्यामुळे अजून ताकद वाढली आहे याचा पतपेढीच्या निवडणुकीत सकारात्मक परिणाम होणार यात शंका नाही. महापालिका निवडणुकीचे वॉर्मअप? बेस्ट पतपेढीची ही निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक ‘नांदी’ म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे शिवसेना (उद्धव) आणि मनसे एकत्र येत असल्याचा हा प्रयोग भविष्यातील मोठ्या युतीकडे संकेत देणारा ठरू शकतो. राजकीय क्षेत्रात हा ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिला जात आहे.

What's Your Reaction?






