वादग्रस्त मंत्र्यांना वाचवण्यासाठीही भेटीगाठी असल्याची चर्चा:पंतप्रधान मोदी-शाहांच्या भेटीतून भाजपच्याराज्यातील नेत्यांवर दबावाची शिंदेंची रणनीती
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन एक वेगळ्या प्रकारचे दबावतंत्र वापरले आहे. आपली थेट दिल्लीश्वरांशी सलगी असल्याचे त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दाखवून दिले. आपल्या पक्षातील काही वादग्रस्त मंत्र्यांना वाचवण्यासाठी या भेटीगाठी होत्या. त्याचसोबत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये उद्धवसेनेला सत्तेपासून कसे दूर ठेवता येईल, यावर त्यांनी चर्चा केली. मुंबई आणि ठाणे मनपात आपल्याला अधिक स्वारस्य आहे, असे त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला भेटून शिंदेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना स्पष्ट संदेश दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, महामंडळांचे वाटप, वादग्रस्त मंत्र्यांचा बचाव आणि इतर मुद्द्यांवर त्यांनी राज्याच्या नेत्यांना एका प्रकारे बाजूला सारले असल्याचीही चर्चा आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचा मोदी-शाह यांच्याशी थेट संपर्क असल्याने, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जागावाटपाच्या मुद्द्यावर राज्यस्तरीय भाजप नेते शिंदेंवर मोठा दबाव आणू शकणार नाहीत. राज्यात त्यांच्याकडून होणाऱ्या अनियमिततेची माहिती शिंदेंच्या माध्यमातून थेट पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचेल, अशी भीती भाजपला वाटत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना शिंदेंना दूर ठेवल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, अशीही शक्यता भाजपला वाटत आहे.

What's Your Reaction?






