सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले:पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आतंकवादासाठी भगवा शब्द वापरू नये, त्याऐवजी सनातनी आतंकवाद म्हणा, असे विधान केले होते. यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. सनातन संस्थेला दहशतवादी संबोधल्याने सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागण्याचीही मागणी केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींची एनआयएच्या विशेष न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. यानंतर काँग्रेसने भगवा दहशतवाद म्हणत हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'भगवा हा महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसाठी पवित्र शब्द आहे. हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग आहे, तो आतंकवादाला जोडू नका, असे आवाहन केले होते. तसेच 'भगवा हा हा शिवछत्रपतींच्या ध्वजाचा रंग असून, महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेसाठी पवित्र शब्द आहे. तो आतंकवादाला जोडू नका, असेही त्यांनी म्हटले होते. माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा सनातन संस्थेला 'दहशतवादी' संबोधल्यामुळे सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाण यांना दहा कोटींची मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. पृथ्वीराज चव्हाणांचे वक्तव्य खोटे, बिनबुडाचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे सनातन संस्थेने म्हटले आहे. 'सनातन संस्थेची बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी,' असा इशाराही या नोटिसीतून देण्यात आला आहे. सनातन संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांच्या वतीने ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटिशीत काय म्हटले? चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे सनातन संस्थेची प्रतीमा मलिन झाली असून हजारो साधकांच्या भावना दुखावल्या आहेत. ही नोटीस मिळूनही उत्तर न दिल्यास चव्हाण यांच्यावर फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करण्यात येणार असल्याचे नोटिशीत म्हटले आहे. तसेच या नोटिसीमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी 15 दिवसांच्या आत लेखी माफी मागणे, मूळ मुलाखतीइतक्याच प्रसिद्धीने ती माफी प्रसिद्ध करणे, भविष्यात कोणतीही बदनामीकारक विधाने न करणे आणि 10 हजार रुपये कायदेशीर खर्च भरपाई देणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण इतकी वर्षे ते झोपले होते का? याबाबत बोलताना अभय वर्तक म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण आज सांगत आहेत की, ‘भगवा’ हा महाराष्ट्राच्या मराठी संस्कृतीचा, छत्रपती शिवरायांचा, संत ज्ञानेश्वरांपासून सर्व संत आणि वारकऱ्यांचा पवित्र भगवा आहे. त्यामुळे कोणीही “भगवा दहशतवाद’’ असे कोणी म्हणू नये, असे काँग्रेस नेत्यांना आवाहन करत आहेत; पण मालेगाव प्रकरण झाले, त्या वेळी काँग्रेसी नेते पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांनी यथेच्छ ‘भगवा दहशतवाद’ म्हणत हिंदूंना लक्ष्य केले. तेव्हा चव्हाण यांना ‘भगवा’ छत्रपतींचा आहे, संतांचा आहे, हे लक्षात आले नाही का? इतकी वर्षे ते झोपले होते का? असा सवालही अभय वर्तक यांनी केला आहे.

What's Your Reaction?






