विधी सेवा प्राधिकरणाचा अभिनव उपक्रम यशस्वी:न्याय आपल्या दारीतून कोट्यवधींचे तडजोडीत रूपांतर
पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने 'न्याय आपल्या दारी' या नावीन्यपूर्ण उपक्रमाद्वारे फिरत्या लोकअदालतीच्या माध्यमातून एकूण 1 कोटी 54 लाख 77 हजार 82 रुपयांची तडजोड केली आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला. 12 जून 2025 रोजी 'विशेष मोबाईल व्हॅन'चा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि कटक मंडळ क्षेत्रात उपक्रम राबविण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात 23 जून रोजी जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे दिवाणी व फौजदारी स्वरूपाची एकूण 130 प्रकरणे निकाली काढून 1 कोटी 49 लाख 41 हजार 332 रुपयांची तडजोड झाली. तसेच 36 पूर्ववाद प्रकरणे निकाली काढून 5 लाख 35 हजार 750 रुपयांची तडजोड करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र के. महाजन यांनी सांगितले की, भारतीय न्यायसंस्थेचा आत्मा म्हणजे समावेश आणि संवेदनशीलता आहे. फिरती लोकअदालत ही लोकशाहीच्या हृदयातून निर्माण झालेली कल्पना आहे. नागरिकांच्या दारी न्याय नेणे हेच खरे उत्तरदायित्व आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव सोनल पाटील यांनी सांगितले की, 'न्याय आपल्या दारी' उपक्रम हा केवळ एक न्यायसेवा नसून न्यायव्यवस्थेवरील विश्वास प्रस्थापित करणारा पूल आहे. न्याय हा न्यायालयाच्या चार भिंतींमध्ये मर्यादित न राहता थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमामुळे शहरासह ग्रामीण भागातील आर्थिक, भौगोलिक किंवा माहितीच्या अभावामुळे न्यायापासून वंचित राहिलेल्या घटकांना न्याय मिळाला आहे. समाजातील वंचित, गरजू, असहाय्य घटकांना गावातच न्याय मिळाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची भावना दिसून आली आहे.

What's Your Reaction?






