लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रदान:चित्रपट निर्मितीत दलित, भटक्या-विमुक्तांचा आवाज वाढणे स्वागतार्ह - नागराज मंजुळे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनातर्फे दिला जाणारा पुरस्कार युवा दिग्दर्शक रमेश होलबोले यांना प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना डॉ. मंजुळे म्हणाले, "भारतरत्न डॉ. आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांमधूनच माझ्यासह रमेश होलबोले सारखे लोक घडत आहेत. चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. चित्रपट निर्मितीसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात समाजातील सर्व स्तरातील लोकांचा पुढाकार असावा." त्यांनी पुढे सांगितले की पूर्वी सिनेमा क्षेत्रात प्रस्थापित लोकांचाच समावेश होता. परंतु आता शिक्षणामुळे भटक्या जमातीमधील लोकही सिनेमा हे माध्यम हाताळत आहेत. त्यांनी स्त्रियांनीही चित्रपट निर्मितीत पुढे यावे असे आवाहन केले. पुरस्कार स्वीकारताना रमेश होलबोले यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "एक मजुराचा मुलगा ते युवा दिग्दर्शक असा प्रवास खडतर होता. शिक्षणाचा गंध नसलेल्या समाजातून मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंसारख्या महापुरुषांच्या प्रेरणेने शिक्षण घेत घडलो." त्यांनी ज्या विद्यापीठात शिक्षण घेतले, त्याच विद्यापीठात अशा महापुरुषाच्या नावाने पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. त्यांनी भाषा व कला क्षेत्र जोपासण्यासाठी आणि चांगली चित्रपट निर्मिती होण्यासाठी शासनाने ठोस निर्णय घ्यावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाहीर हेमंत मावळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची "माझी मैना गावाकडे राहीली" ही छक्कड सादर केली. कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली आणि पदमश्री डॉ. मिलिंद कांबळे, ऍडव्होकेट एकनाथ जावीर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कार्यक्रमास प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे प्रमुख डॉ. सुनील भंडगे, अधिसभा सदस्य बागेश्री मंठाळकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

What's Your Reaction?






