महावितरणमध्ये 5,500 विद्युत सहायकांची भरती:वीज ग्राहकांना दर्जेदार, तत्पर सेवा देणे आद्य कर्तव्य; संचालक राजेंद्र पवार यांचा निर्धार
महावितरणने जवळपास साडेपाच हजार विद्युत सहायकांच्या भरतीची निवड यादी नुकतीच जाहीर केली आहे. लवकरच हे कर्मचारी रुजू होऊन शाखा कार्यालये अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. वीज ग्राहकांना दर्जेदार व तत्पर सेवा देणे हे महावितरणचे कर्तव्य आहे, असा निर्धार महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी केला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत महावितरणचे अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्याचे नवे मापदंड निर्माण केले आहेत. ग्राहक सेवेचा हा वारसा जोपासत वीजग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा आणि जनमानसात महावितरणची प्रतिमा उंचवा, असे आवाहन ही त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे शुक्रवारी (1 ऑगस्ट) भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्राच्या सभागृहात सत्कार समारंभ व तांत्रिक कामगारांची कार्यशाळा आयोजित केली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संचालक पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे होते, तर सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन, महापारेषणचे प्रभारी मुख्य अभियंता रंगनाथ चव्हाण, अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, कार्यकारी अभियंता प्रसाद महातोले, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विश्वास पाटील, संघटनेचे पदाधिकारी नानासाहेब चट्टे, मजहर पठाण, कैलास गौरकर, शेख मुजीब, बी.डी. पाटील, अजिज पठाण, आर. पी. थोरात, ताराचंद कोल्हे, साजेद मियाँ यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेतर्फे सरचिटणीस सय्यद जहिरोद्दिन यांनी संचालक (मानव संसाधन) पदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र पवार यांचा यथोचित सत्कार केला. यावेळी पवार म्हणाले, तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महावितरणमध्ये मी एकूण 36 वर्षे सेवा केली. यात सर्वाधिक 16 वर्षे मी शाखा अभियंता होतो. त्यामुळे सर्व तांत्रिक कर्मचारी माझ्या सर्वात जवळचे होते, आहेत आणि राहतील. महावितरण ही तांत्रिक कर्मचाऱ्यांवर चालते. शाखा अभियंता व तांत्रिक कर्मचारी महावितरणची प्रतिमा ठरवतात. आपले कार्यालय व उपकेंद्र स्वच्छ व सुंदर ठेवून त्याना आयएसओ मानांकन मिळवण्याचा प्रयत्न करा. संचालक पवार म्हणाले की, महावितरणच्या अभियंते, कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले तर कुठल्याही स्पर्धेत आपण टिकू शकतो. त्यामुळे अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा, तत्परतेने नवीन वीजजोडणी, ग्राहकांच्या तक्रारींचा वेळेवर निपटारा, वीजबिलांची शंभर टक्के वसुली यास आपले प्राधान्य असले पाहिजे. महावितरणने जवळपास साडेपाच हजार विद्युत सहायकांच्या भरतीची निवड यादी नुकतीच जाहीर केली आहे. लवकरच हे कर्मचारी रुजू होऊन शाखा कार्यालये अधिक प्रभावीपणे काम करू शकतील. तांत्रिक कामगार, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. स्थानिक प्रश्नांबाबत संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात येतील. बदल्यांमध्ये पारदर्शकता आणली असून, सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पवार यांनी सांगितले. प्रास्ताविकता सय्यद जहिरोद्दिन यांनी राजेंद्र पवार यांच्या रूपाने शाखा अभियंता ते मुख्य अभियंतापदावर काम केलेला आपलाच अधिकारी मानव संसाधन संचालकपदी नियुक्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पवार यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे अल्पावधीतच कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न सुटल्याचे जहिरोद्दिन म्हणाले. भाऊसाहेब भाकरे यांनी अध्यक्षीय समारोप केला. सूत्रसंचालन कैलास गौरकर यांनी केले. शेख रफिक यांनी आभार मानले.

What's Your Reaction?






