एकतर्फी प्रेमातून तरुणाचा चाकूने गळ्यावर वार:दुसरा वार वाचवताना तरुणीने हाताची चार बोटे गमावली, नागपुरातील घटनेने खळबळ
एका तरुणाच्या एकतर्फी प्रेमातून एका निष्पाप तरुणीवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने गुमथी गावात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना दुपारी गावातील हनुमान मंदिर परिसरात घडली. या हल्ल्यात २० वर्षीय तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्या डाव्या हाताची चार बोटे पूर्णपणे कापल्या गेली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रोशन दीपक सोनेकर (वय ३२, रा. गुमथी) या विवाहित तरुणाने गेल्या काही वर्षांपासून गावातील एका युवतीचा पाठलाग सुरू केला होता. तो सतत दारूच्या नशेत राहायचा आणि तिला वारंवार त्रास द्यायचा. काही महिन्यांपूर्वी त्याच्या पत्नीने त्याला सोडचिठ्ठी दिली होती. दरम्यान, तरुणीने त्याला स्पष्ट नकार दिला होता. मात्र, रोशनची छेड काढण्याची मालिका सुरूच राहिली. २५ एप्रिल २०२५ रोजी तर त्याने भररस्त्यात कोराडी नाक्यावर तिच्यावर हात उगारला होता आणि नंतर तिच्या घरात घुसून मारहाण केली होती. याबाबत कोराडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असली तरी, अपेक्षित कडक कारवाई न झाल्याने आरोपीचे मनोबल अधिकच वाढले होते. दररोजचा मानसिक त्रास सहन करीत, युवतीने बीएससी नर्सिंगचे शिक्षणही थांबवले. मात्र गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे गावातील हनुमान मंदिरात पूजा करण्यासाठी गेली असता, रोशनने मागून येत तिच्यावर भाजी कापण्याच्या चाकूने गळ्यावर वार केला. दुसरा वार करणार इतक्यात, तिने धाडसाने चाकू पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात तिच्या डाव्या हाताची चार बोटे निकामी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत ती घराकडे धावली आणि आईला घडलेला प्रकार सांगितला. तातडीने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर नागपूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या प्रकरणी खापरखेडा पोलिस ठाण्यात रोशन सोनेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

What's Your Reaction?






