सुप्रिया सुळेंनी घेतली पीएम नरेंद्र मोदींची भेट:हातमाग दिनानिमित्त खास पैठणी दिली भेट, मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींना एक खास पैठणी देखील भेट दिली. महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरण प्रचंड तापलेले असताना सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणे यामागे, राजकीय आणि सामाजिक कारण असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगत आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या भेटीचे फोटो शेअर करत माहिती दिली आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. यावेळी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त महाराष्ट्राच्या कुशल विणकरांनी बनवलेली खास पैठणी त्यांना भेट दिली. भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. मतदारसंघातील प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती संसद भवनात झालेल्या या भेटीबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नसला, तरी प्राथमिक माहितीनुसार आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्न, तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अडचणी, शेतीविषयक धोरणे यावर सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीमध्ये थेट लढत पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचा एक गट सहभागी आहे, तर सुप्रिया सुळे या दुसऱ्या गटात म्हणजेच विरोधात कार्यरत आहेत. सत्ताधारी गट आणि विरोधातील गट यांच्यात नेहमी टीका टीप्पणी होत असते. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीत याबाबत चर्चा झाली का? असेही बोलले जात आहे. मोदी शरद पवारांचा निरोप विचारू शकतात काही महिन्यांपूर्वी दिल्लीत पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. त्या वेळी मोदींनी शरद पवार यांना खुर्ची देणे, त्यांच्यासाठी पाणी देणे यासारख्या कृतींमुळे राजकीय परिपक्वतेचे एक सकारात्मक दर्शन घडले होते. त्यामुळे या पार्श्वभूमीवर मोदी-सुळे भेटीत शरद पवार यांचा उल्लेख झाला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. नरेंद्र मोदी यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडून शरद पवार यांचा निरोप विचारू शकतात. केंद्र सरकारची सुळेंना महत्त्वाची भूमिका दरम्यान, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर केंद्र सरकारने विविध खासदारांच्या शिष्टमंडळांना विविध देशांमध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी पाठवले होते. या शिष्टमंडळांमधील एका मंडळाच्या जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर दिली होती. त्यांनी ती भूमिका चांगली पार पडली. याबाबतही या भेटीत चर्चा झाल्याची शक्यता आहे.

What's Your Reaction?






