बेघर निर्वासितांच्या न्यायासाठी 'जन आक्रोश महामोर्चा':क्रांती चौकापासून विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आंबेडकरी संघटनांचा मोर्चा
छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या बुलडोझर कारवाईविरोधात आणि बेघर झालेल्या नागरिकांच्या न्यायहक्कांसाठी शुक्रवारी ८ ऑगस्ट रोजी 'सर्वपक्षीय जन आक्रोश महामोर्चा' आयोजित करण्यात आला. क्रांती चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दुपारी १ वाजता हा मोर्चा सुरू झाला. दुपारी ३ वाजता मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर पोहोचला. आयोजकांनी सांगितले की, "अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून कोणतेही पुनर्वसन न देता गोरगरीब, दलित, बहुजन, कामगार, अल्पसंख्याक व मागासवर्गीय नागरिकांना पावसाळ्याच्या तोंडावर बेघर केले जात आहे. यामुळे हे नागरिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत." हा मोर्चा कोणत्याही एकट्या संघटनेचा नव्हता. सर्व धर्मीय, सर्व पक्षीय, आंबेडकरवादी, संविधानवादी, समतावादी, मानवतावादी संघटना आणि आंबेडकरी चळवळीच्या पुढाकारातून याचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचा मार्ग क्रांती चौक, सिल्लेखाना, पैठण गेट, गुलमंडी, सिटी चौक, किल्ले अर्क, व्हिआयपी रोड मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत होता. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तेथे मनपा आणि लोकप्रतिनिधींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मोर्चात दिपक निकाळजे, अरविंद कांबळे, दिपक केदार, अमित वाहुळ, जयश्री शिरके, विष्णु जगताप, आनंद कस्तुरे, जयेश अभंग, मनोज जाधव, मिलिंद बनसोडे, विजय शिंगारे, वसंतराज वक्ते, बलराज दाभाडे, सिध्दोधन मोरे, नागेश केदारे, विजय बचके, सचिन जोगदंडे, संतोष चव्हाण, राजकुमार कांबळे आदी कार्यकर्ते व प्रतिनिधी सहभागी झाले होते.

What's Your Reaction?






