कळमनुरीत 36 वर्षानंतर माजी विद्यार्थ्यांचा भरला मेळा:सांस्कृतीक कार्यक्रम, नृत्याने आणली रंगत; शिक्षकांचा सत्कार करून व्यक्त केली कृतज्ञता
कळमनुरी येथील महात्मा फुले विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा तब्बल ३६ वर्षानंतर पुन्हा शाळेतच मेळा भरला. तत्पूर्वी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, गटचर्चा यासह इतर कार्यक्रमांनी रंगत आणली. शाळेमध्ये पुन्हा तोच वर्ग त्याच बेंचवर बसून माजी विद्यार्थ्यांनी जून्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शिक्षकांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कळमनुरीच्या महात्मा फुले विद्यालयाच्या सन १९८८ च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे दोन दिवसीय गेट टू गेदर चांगलेच रंगले. शनिवारी ता. ३१ केंब्रिज स्कुल ऑफ स्कॉलर्स या ठिकाणी माजी विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. दुपारी या ठिकाणी जमलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३६ वर्षांनी भेटल्यानंतर एकमेकांची ख्याली खुशाली विचारली पुन्हा एकदा परिचय करून देत काय करतात, कुठे राहतात याची माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी सांस्कृतीक कार्यक्रम झाला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी देहभान विसरून सांस्कृतीक कार्यक्रमात विविध गाण्यांवर नृत्य सादर केले. कविता वाचन, शेरोशायरीही सादर करण्यात आली. दरम्यान, रविवारी ता. १ शाळेत जाऊन पुन्हा त्याच वर्गात त्यात बेंचवर बसून जून्या आठवणींना उजाळा दिला. माझ्या जागेवर तू का बसला, पलिकडे सरकून बस, सरांना नांव सांगू का अशा नानाविध तक्रारी व किरकोळ वादाच्या आठवणीमुळे एकच हास्यकल्लोळ उडाला. सरांचा खाल्लेला मार, हातावर छड्यांचे वळ एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील मित्रांनी रुमाला बांधून आणलेल्या भाकरी कशा खाल्या या आठवणींनाही उजाळा मिळाला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात तत्कालीन व विद्यामान शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करण्यात आला. शिक्षकांच्या मार्गदर्शन अन छड्यांमुळेच आपण जीवनात यशस्वी होऊ शकलो याची कबुली माजी विद्यार्थ्यांनी दिली. गुरुजनांनीही पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना यशस्वी भव, खूप मोठे व्हा असा आशीर्वाद दिला. त्यानंतर विद्यार्थी पुन्हा भेटूत या आश्वासनावर परतीच्या प्रवासाला लागले. या कार्यक्रमासाठी डॉ. संतोष कल्याणकर, मधुकर गुंजकर, विठ्ठल दिंडे, देवराव कारगुडे, साहेबराव सुर्यवंशी, कैलास धनवे, रविंद्र कस्तुरे, सुधाकर राठोड, नितीन कल्याणकर, बिलाल कुरेशी, शेख सलीम, अनिल भोसकर, शिवाजी अंभोरे, यांच्यासह माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पुढाकार घेतला.

What's Your Reaction?






