1962-65 च्या युद्धातील वीर जवानांच्या स्मृतींना उजाळा:वानवडी येथे 11 वीरपत्नींचा सन्मान; वीर स्मृती वसाहतीत विशेष कार्यक्रम
ज्यांनी संसाराचे स्वप्न साकार होण्याआधीच देशासाठी पती गमावले... ज्यांचे वैवाहिक जीवन काही क्षणांचेच ठरले, पण मनात देशभक्तीचा अभिमान सदैव दरवळत राहिला... अशा सन १९६२, १९६५ च्या युद्धातील बेपत्ता जवानांच्या अकरा वीरपत्नींचा सन्मान वानवडी येथील वीर स्मृती वसाहत येथे करण्यात आला. सन १९६२ च्या आणि सन १९६५च्या भारत-पाकिस्तान युद्धाला नुकतीच ६० वर्षे पूर्ण झाली, यानिमित्ताने सैनिक मित्र परिवाराच्या वतीने वीरपत्नींच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, तसेच सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, सैनिक मित्र परिवाराचे आनंद सराफ, किरण पाटोळे, विष्णू ठाकूर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी वीरपत्नींना मानाचे उपरणे, तसेच मिठाई प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे स्वीय सहाय्यक अभिजीत मोडक यांच्याकडे वीर स्मृती वास्तू दुरूस्ती व नूतनीकरणासाठी निवेदन देण्यात आले. आनंद सराफ म्हणाले, सन १९६२ च्या भारत-चीन युद्धात बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आणि त्यांच्या बलिदानाची स्मृती जपण्यासाठी, वीर स्मृती ही वसाहत १९६८ साली वानवडी बाजार येथे उभारण्यात आली. ही वसाहत केवळ निवासस्थान नसून, ती देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांच्या त्यागाची आणि धैर्याची साक्ष देणारे एक स्मारक आहे. वीरपत्नींच्या या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने केवळ शूरवीर नव्हे, तर त्यांच्या मागे उभ्या राहणाऱ्या धैर्यवती स्त्रियाही देशाच्या अस्सल प्रेरणा आहेत, असेही त्यांनी सांगितले.

What's Your Reaction?






