बहीण-भावाच्या बंधनाला महागाईची झळ:आकर्षक राख्यांनी बाजारपेठा सजल्या, राखीच्या दरात 20 ते 25% वाढ
बहीण-भावाच्या प्रेमळ नात्याचे ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन शनिवार, ९ ऑगस्टला साजरा होणार आहे. मात्र, यंदा भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असणारी राखी यंदा २० ते २५ टक्क्यांनी महागली आहे. रक्षाबंधन निमित्त शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली आहे. भाऊरायाच्या पसंतीस उतरेल अशी राखी घेण्यासाठी महिला बाजारात गर्दी करत आहेत. तर दुसरीकडे आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना भाऊही बाजारात दिसत आहेत. अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. काही बहिणींनी बाहेरगावी किंवा विदेशात राहणाऱ्या भावांसाठी राख्या खरेदी करून त्या स्पीड पोस्ट किंवा ऑनलाइन पाठवल्या आहेत. रक्षाबंधनाच्या सणावर यंदा महागाईचे सावट दिसून येत आहे. दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. बाजारात सर्वच प्रकारच्या राख्या महाग असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी देवराख्या ५ रुपये डझनप्रमाणे सहज उपलब्ध होत असत. आता या राख्यांची किंमत ७ ते १० रुपये झाली आहे. बाजारात ५ रुपयांपासून ते ३०० रुपयांपर्यंत राख्या उपलब्ध आहेत. यात ५० ते १०० रुपयांच्या राख्यांची अधिक विक्री होत आहे. ऑनलाइनचे आकर्षण बाजारात आकर्षक ऑनलाइन राख्या उपलब्ध आहेत. त्याचवेळी बदलत्या प्रचलनानुसार राख्या खरेदीसाठी विविध ऑनलाइन साइटवरही राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये चांदीच्या राख्यांसोबतच ॲक्रेलिक व लाकूड या प्रकारातील राख्यांनाही मोठी मागणी आहे. ऑनलाइन राख्या खरेदी करताना भरघोस सूट मिळत असल्यामुळे काही बहिणींची या राख्यांना पसंती असल्याचे दिसून येत आहे. सोबतच लहान आकाराच्या राख्यांना ग्राहकांची अधिक पसंती मिळत आहे. राखीसाठी लागणारे रेशीम, कुंदन तसेच मजुरीत वाढ झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांच्या भावात १० टक्क्यांची वाढ झाली असे राखी विक्रेत्यांनी सांगितले.

What's Your Reaction?






