रुबी हॉल रुग्णालयातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण:डॉ. तावरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
रुबी हॉल रुग्णालयातील बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणात सहआरोपी तत्कालीन ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अजय तावरे यांची पोलीस कोठडीची मुदत संपुष्टात आल्यानंतर बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आरोपीकडे सदर गुन्ह्याचे अनुषंगाने आणखी सखोल तपास करणे गरजेचे असल्याने पोलीस कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी केली. परंतु या प्रकरणात न्यायालयाने आरोपी डॉ.तावरे याला १४ दिवसांचे न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे. पुण्यातील कल्याणीनगर येथील मागील वर्षीच्या पोर्शे कार अपघात प्रकरणात आरोपींच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात अदलाबदल केल्या प्रकरणात मागील एक वर्षापासून डॉ.तावरे हा येरवडा कारागृहात बंदिस्त आहे. त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड पोलिसांनी तपासल्यानंतर त्याचा रुबी हॉल क्लिनीक मध्ये सन २०२२ मध्ये घडलेल्या बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण रॅकेट मध्ये सक्रीय सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास न्यायालयाकडून प्रॉडक्शन वॉरंट घेऊन पुणे पोलीसांचे गुन्हे शाखेने अटक केली. डॉ.तावरे याच्या अध्यक्षतेखाली विभागीय मानवी अवयव प्राधिकरण समितीने एकूण १० किडनी प्रत्यारोपणांना परवानगी दिली असून त्याबाबतची सविस्तर माहिती असलेल्या फाईल गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्या आहे. आरोपी हा गुन्हा दाखल झालेल्या इतर आरोपींच्या देखील संर्पकात असल्याचे तांत्रिक विश्लेषणातून निष्पन्न झालेले आहे. डॉ.तावरे याने त्याचा पदाचा दुरुपयोग करुन बनावट व्यक्तीला बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपणास परवानग्या दिल्या. यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झालेली असल्याने पोलिसांनी डॉ.तावरे याच्याशी संबंधित बँक खात्यांची देखील माहिती जमा करुन त्याचे विश्लेषण सुरु केले आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश इंगळे करत आहे.

What's Your Reaction?






