शुद्ध आचरण, पवित्र भावाने परमात्म्याचे दर्शन:कळवणच्या मानूर येथे खुशालीताई उगले यांचा कीर्तनातून भाविकांना उपदेश
शुद्ध आचरण आणि अंतर्मनात पवित्र भाव असेल तर डोळे बंद करून परमात्म्याची आठवण काढताच तो डोळ्यांसमोर दिसतो. असा उपदेश खुशालीताई उगले यांनी व्यक्त केला. तालुक्यातील मानूर येथील मार्कंडेश्वर भजनी मंडळ आणि मानूर ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कीर्तन सप्ताहाचे पहिले पुष्प गुंफताना उगले बोलत होत्या. परमार्थ करतांना प्रत्येकाने निस्वार्थ भावनेने परमार्थ करावा. देवाने सुंदर असे जीवन आपल्याला दिले आहे. मनुष्य जीवनात चांगले वाईट घडणारच आहे. पण प्रत्येकाने जे जे चांगले होईल ते ते घ्यावे. नको असलेले सोडून द्यावे. याशिवाय कठीण परिस्थितीत मनाला शांततेची गरज असल्याने परमात्म्याचे नामस्मरण, ध्यानधारणा करावी. ज्यामुळे तन मन शांत राहते आणि कुठल्याही संकटावर मात करता येते. कीर्तन सप्ताहाचे आयोजन करून देव देश आणि धर्माचे रक्षण करण्याचे पवित्र कार्य सुरू असल्याने या सप्ताहासाठी नागरिकांनी मदत करून आपल्या जबाबदारीतून उतराई व्हावे. घरातील महिला आणि मुलांनी कीर्तन सप्ताहात सहभागी व्हावे व श्रावणाच्या पवित्र महिन्यात देवाच्या नामस्मरणाची आलेली संधी साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी गायनाचार्य अक्षय महाराज वाघ, सोपान महाराज खैरनार, मृदुंगाचार्य ओंकार महाराज जाधव यांनी अभंगांचा संदर्भ देत सुरेख साथ दिली. हरिनाम सप्ताहात दररोज कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी मानूरसह कळवण शहरात व परिसरातील भाविक येत आहेत. ंंहरिनाम सप्ताहात यांची कीर्तनसेवा कीर्तनसेवा मानूर येथील हरिनाम सप्ताह काळात भाऊजी महाराज, अंजलीताई शिंदे, लीलाधर महाराज ओझरकर, परमेश्वर महाराज उगले यांची कीर्तन सेवा होणार आहे. (दि. ६) रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत प्रकाश महाराज गांगुर्डे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. याच दि वशी महाप्रसाद होणार आहे. या काळात दररोज पहाटे ५ ते ६ काकड आरती, सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे.

What's Your Reaction?






