दरोड्याच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी दिलीप ठवकरसह साथीदारांना पकडले:ऑटो व मोटरसायकलवरून शस्त्रांसह धुमाकूळ घालत होते, 14 गंभीर गुन्हे दाखल
नागपूर पोलिसांनी दरोड्याच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपी दिलीप ठवकरसह त्याच्या साथीदारांना रंगेहाथ पकडले आहे. आरोपी ऑटो व मोटरसायकलवरून फिरून शस्त्रांसह धुमाकूळ घालत होते. वाठोडा पोलिस ठाण्यात ३० जुलै २०२५ रोजी शुभम अशोक मंडपे (वय २९) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम मंडपे यांना त्यांचा आतेभाऊ रोहीत म्हैसगवळी यांनी फोन करून बोलावले होते. शुभम आतेभाऊला दुचाकीवर घेऊन जात असताना दिघोरी परिसरात दुपारी १२ वाजताच्या सुमारास आरोपींनी ॲटो व दुचाकीने त्यांचा पाठलाग केला. आरोपी दिलीप ठवकरने वस्तऱ्याने शुभम मंडपे यांच्या चेहऱ्यावर घाव मारून मारहाण केली. आरोपी शेंडीवाला याने शुभम यांच्या खिशातील ओप्पो कंपनीचा पिवळ्या रंगाचा फोन व नगदी १००० रुपये जबरीने काढून घेतले. दिलीप ठवकरने तलवार हातात घेऊन "किसीने पुलिस को बताया तो जानसे मार दुंगा" अशी धमकी दिल्याने आजूबाजूचे लोक घाबरून पळून गेले. ३० जुलै रोजी वाठोडा पोलीस ठाण्यातील बीट मार्शल शैलेंद्रसिंग गौर व जितेंद्र मनगटे यांना नियंत्रण कक्षातून डायल ११२ वर सूचना मिळाली. दिघोरी परिसरात दिलीप ठवकर व त्याचे साथीदार चाकू, तलवार यांचा धाक दाखवून लोकांना जखमी करून लुटमार करत असल्याची माहिती मिळाली. दिलीप कृष्णाजी ठवकर हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचे ३ गुन्हे, खुनाचा प्रयत्न १, दरोडा १, दरोड्याची तयारी २ गुन्हे आहेत. याशिवाय किडनॅपिंग, विनयभंग, मारामारी, शिवीगाळ, जीवे ठार मारण्याची धमकी, घातक शस्त्र व अग्नीशस्त्र बाळगणे असे एकूण १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस शिपाई मिलिंद ठाकरे व रामु तितरमारे यांना दिघोरी चौकाजवळ ओमकार लॉनसमोर आरोपी लुटमार करताना दिसले. त्यांनी जिवाची पर्वा न करता दिलीप ठवकर, मिलिंद दयाराम मेश्राम व एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेला वस्तरा व दरोड्यामध्ये जबरीने घेतलेले फिर्यादीचे एक हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. आरोपींना २ आॅगस्टपर्यंत पीसीआर देण्यात आला आहे. नितीन मेश्राम व शेंडीवाला या आरोपींचा शोध सुरू आहे.

What's Your Reaction?






