क्रांतिसिंह नाना पाटील यांची शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती:विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने राज्यभर अभिवादनाचे कार्यक्रम
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्रच्या वतीने जयंती उत्सव आणि अभिवादन कार्यक्रम दि. ०३ ऑगस्ट २०२५ रोजी हा महाराष्ट्रात ठिकठिकाणी आयोजित केले आहेत, अशी माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे प्रवक्ते कॉ अविनाश कदम आणि प्रा. गौतम काटकर यांनी दिली. साताऱ्याच्या प्रतिसरकारची स्थापना ज्या ठिकाणी झाली, त्या सांगलीतील शिराळा तालुक्यातील पणुंब्रे या ठिकाणी अभिवादनाचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहिल्यानगर, राहुरी, नंदुरबार, पालघर, मुंबई, ठाणे, नागपूर, इस्लामपूर, विटा यांच्या ठिकाणी देखील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. सत्यशोधक महात्मा फुले आणि सत्याग्रही महात्मा गांधी यांचे सच्चे अनुयायी, क्रांतिसिंह म्हणून देशभर प्रसिद्ध, शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांचे राज्य व्हावे म्हणून स्वातंत्र्यानंतरही आयुष्याच्या अखेरपर्यंत झुंजलेला त्यागी, असामान्य देशभक्त, माळकरी मार्क्सवादी अशी क्रांतीसिंहांची ओळख जी सार्थच आहे. अव्वल दर्जाचे समाज परिवर्तक, पहाडी वक्ते, सातारच्या प्रतिसरकारचे प्रेरणादायी नेते, ग्रामीण जनतेत समाजवादाचे स्वप्न पेरणारे प्रवक्ते, संसदेमध्ये शेतीमालाच्या दराबाबत मराठी भाषेत पहिली तोफ डागणारे संसदपटू, श्रमिकांचे कैवारी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या परिवर्तनाच्या चळवळीचे प्रबळ समर्थक, मार्क्सवादाचे मराठमोळे भाष्यकार, समाज संघटक आणि प्रबोधन करणारे उच्च कोटीचे सत्यशोधक, संत संस्कृतीचे दर्शनकार क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने महाराष्ट्रभर आयोजित केले जाणार असून या कार्यक्रमांमध्ये पुरोगामी समविचारी संघटना आणि कार्यकर्ते यांना देखील सामावून घेतले जाणार आहे, असे विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव व सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे यांनी सांगितले. सातारा येथे प्रा. डॉ. भास्करराव कदम यांचे व्याख्यान सातारा येथे सुटा या प्राध्यापक संघटनेच्या सभागृहात छत्रपती शिवाजी महाविद्यालय सातारचे इतिहासाचे सेवानिवृत्त प्रा. डॉ. भास्करराव कदम यांचे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील योगदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. सिटूचे नेते कॉ. अॅड. वसंतराव नलावडे हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. हा कार्यक्रम रविवार दि 3 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. सातारा येथील कार्यक्रमात सम्यक विद्रोहीच्या क्रांतिसिंह नाना पाटील विशेषांकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.

What's Your Reaction?






