माणिकराव कोकाटेंची अखेर उचलबांगडी:अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना श्रेय देण्याची चूक टाळली; मुंडेंवेळी झाली होती गडबड
राज्य विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषिमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर भरणे यांच्याकडील क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाचा कारभार कोकाटेंकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गुरूवारी रात्री उशिरा यासंबंधीची अधिसूचना जारी करण्यात आली. दरम्यान, अजित पवारांनी यावेळी स्वतः कोकाटेंची उचलबांगडी केली. त्यामुळे या कारवाईचे श्रेय फडणवीसांकडे न जाता त्यांच्याचकडे राहिले. माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. स्वतः फडणवीसांनी या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ते कोकाटेंचा राजीनामा घेतील असा दावा केला जात होता. पण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडील कृषिमंत्रिपदाचा पदभार काढून घेतला. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावेळी झाली होती चूक विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात फडणवीसांनी स्वतः त्यांचा राजीनामा घेतला होता. त्यामुळे त्यांच्यावरील कारवाईचे संपूर्ण श्रेय फडणवीसांना मिळाले होते. पण यावेळी अजित पवारांनी स्वतः कोकाटेंची उचलबांगडी करून त्यांच्यावरील कारवाईचे श्रेय फडणवीसांना मिळणार नाही याची काळजी घेतली. पवारांच्या या खेळीची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधक खांदेपालटावर टीका करत असले तरी अजित पवारांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचीही चर्चा राजकारणात सुरू आहे. क्रीडा व युवक खाते मिळाल्यामुळे दत्तात्रय भरणे काहीसे नाराज होते. खातेवाटपानंतर भरणेंनी यासंबंधीची आपली नाराजी बोलूनही दाखवली होती. ही गोष्ट अजित पवारांनी आपल्या लक्षात ठेवली होती. पण आता माणिकराव कोकाटेंवर कारवाई करून त्यांनी भरणेंची नाराजी दूर केली. या प्रकारे कोकाटेंवर कारवाईही झाली आणि भरणेंची नाराजीही दूर झाली असे सांगितले जात आहे. आत्ता पाहू कोण आहेत नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे? कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. ते इंदापूर मतदारसंघाचे विधानसभेत नेतृत्व करतात. ते येथून तिसऱ्यांदा विजयी झालेत. महाविकास आघाडीच्या काळात त्यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले होते. त्यानंतर महायुतीच्या काळातही अजित पवारांनी त्यांना मंत्रिपद देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. त्यानंतर फडणवीस यांच्या सरकारमध्येही त्यांना सलग तिसऱ्यांदा मंत्रिपद देण्यात आले होते. आता त्यांना मंत्रिमंडळातील तिसऱ्या क्रमांकाचे खाते समजले जाणारे कृषिमंत्र देण्यात आल्यामुळे ते अजित पवारांच्या आणखी जवळ गेल्याचे मानले जात आहे. सरकारमध्ये कुरघोड्यांचे राजकारण - रोहित पवार दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुती सरकारमध्ये कुरघोड्यांचे राजकारण रंगल्याचा आरोप केला आहे. शिंदे साहेब जेव्हा गावाला किंवा दिल्लीला जातात, तेव्हाची परिस्थिती म्हणजे …‘अंतर्गत कुरघोड्यांचा पुन्हा सुरू झाला खेळ आणि आल इज़ नॉट वेल सांगण्याची आली वेळ’…असाच त्याचा अर्थ असतो. मित्रपक्षाकडून होणाऱ्या कुरघोड्यांची चिड शिंदे साहेबांना नक्कीच असेल. असो, जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या या निष्क्रिय सरकारच्या नियमित कृतीशील कुरघोड्यांना महाराष्ट्र देखील कंटाळला आहे हे मात्र नक्की, असे त्यांनी म्हटले आहे.

What's Your Reaction?






