साकोलीतील तलावाची पार फुटली:450 एकरातील शेती जलमय, महामार्ग ठप्प, प्रशासनावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप
भंडारा जिल्ह्याच्या साकोली येथील लघु पाटबंधारे जिल्हा परिषदेच्या तलावाची पार फुटल्याने परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेमुळे साकोली आणि गडकुंभली गावातील अंदाजे 300 ते 450 हेक्टर शेती जलमय झाली असून, शेत पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे साकोली-चंद्रपूर राज्य महा मार्गही पूर्णपणे ठप्प झाला आहे. साकोली शहराच्या अगदी जवळ असलेल्या या ऐतिहासिक तलावाची पार आज ( 1 ऑगस्ट) पहाटे साडेचार वाजता फुटली. या घटनेने संपूर्ण साकोली शहर हादरले असून, दोन घरांमध्ये पाणी शिरले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी आणि माजी नगरसेवक ॲड. मनिष कापगते यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. कापगते यांच्या मते, "तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली बांधकाम विभागाने पिचिंगचे दगड जेसीबीने काढल्याने तलावाची पार कमकुवत झाली आणि ही दुर्घटना घडली. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना? स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला या तलावाच्या भगदाडाबाबत वारंवार माहिती दिली होती. भगदाडातून पाणी वाहत असल्यामुळे ते भगदाड मोठे झाले आणि पावसाळ्यामुळे तलावात पाणी ओव्हरफ्लो झाले. प्रशासनाने या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद मुख्याधिकारी मंगेश वासेकर आणि पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासनाने नागरिकांना तलावाच्या पाळीकडे न जाण्याचा इशारा दिला आहे, कारण अजूनही प्रवाहात माती सरकून जीवितहानी होण्याची शक्यता आहे. लोकांनी तलावाच्या परिसरात गर्दी करू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे. या घटनेमुळे साकोली तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून, प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करत आहेत.

What's Your Reaction?






