8 हजार हेक्टरवरील पिकांची हानी; पंचनामे तातडीने करून मदत द्या:काँग्रेस, शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले निवेदन
उन्हाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ ते १० हजार क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, तातडीने अशी मागणी काँग्रेसने मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात केली. तसेच बाळापूर तालुक्यातीलही शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे हानी भरपाईची मागणी केली आहे. बाळापूर तालुक्यातील उरळ मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीने १३२ वर्षाचा विक्रम मोडला असून या पावसाने बागायतदार शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मोरगाव सादिजन, टाकळी, निमकर्दा, झुरळ, सावरपाटी, रतनपुरी, मोरझाडी, अंत्री आदी शिवारातील उन्हाळी कांदा, ज्वारी, तीळ इत्यादी बागायती पिके मोठ्या प्रमाणात पेरली होती. मात्र, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पीक हे ओले होऊन शेतातच खराब झाले आहे. बारा तास सतत धार पाऊस पडत असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याच्या ढिगा खालून पावसाचे पाणी वाहून गेले. त्यामुळे हा कांदा आता शेतकऱ्यांना फेकून दिल्याशिवाय पर्याय नाही. तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणी शेतकरी पुत्र गोपाल पोहरे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार बाळापूर यांना केली आहे. निवेदन देते वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष देवानंद साबळे, युवक जिल्हाध्यक्ष रवी गावंडे, अमोल माळी, प्रशांत गायकवाड, पवन गाडे, मधुसूदन टीकार आदी शेतकरी उपस्थित होते. असे झाले नुकसान जिल्ह्यात २३ ते २६ मे दरम्यान ११३२ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. एकूण १०७ गावांमध्ये ही हानी झाली. यात अकोला-३४, बार्शीटाकळी-९, बाळापूर-३७ व पातूरमधील २७ गावांचा समावेश होता. या तालुक्यामध्ये अनुक्रमे २८६, २५, २५० व ५६१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. उन्हाळी कांदा, केळी, भुईमंूग, ज्वारी, लिंबू, मका आदी पिके उद्ध्वस्त झाली. जिल्ह्यात २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्वारी, कांदा, मका, मूग, तीळ, भुईमूग, लिंबू, पपई, संत्रा, भाजीपाला, केळीचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी करून गंजी उभी करून ठेवली. मात्र ही पिके जमीनदोस्त झाल्याचे काँग्रेसने निवेदनात म्हणाले आहे. मात्र सर्वेक्षण करणारे शेतकरी या पिकांचे सर्वेक्षण करीत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या पिकांचेही पंचनामे करण्यात यावे, अशीही मागणी काँग्रेसचे केली आहे. निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, प्रकाश तायडे, अतुल अमानकर, अॅड. महेश गणगणे, तश्वर पटेल, भीमराव खंडारे, पद्माकर वासनिक, शाम नेमाडे, रवींद्र लांडे आदी होते.

What's Your Reaction?






