सर्वधर्म समभावाची ज्योत सतत तेवत ठेवा:ठाणेदार पंकज कांबळे, हातरुणला नागपंचमी उत्सव
प्रतिनिधी |बाळापूर नागपंचमीचे आध्यात्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे. मंदिर हे पवित्रता, भक्ती आणि आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे. हातरुणमधील नागपंचमीचा उत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. सण आणि उत्सव साजरे करतांना सर्वधर्म समभावाची ज्योत तेवत ठेवण्याचे आवाहन उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे यांनी याप्रसंगी केले. श्री. सोपीनाथ महाराज भाटे सेवा समिती हातरुणद्वारे नागपंचमी उत्सव साजरा होत आहे. नागपंचमी यात्रेला मोठ्या संख्येने भाविक मंदिरावर येतात. नागपंचमी उत्सवाच्या निमित्ताने उरळ पोलीस स्टेशनकडून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात येत आहे. उरळचे ठाणेदार पंकज कांबळे यांनी . सोपीनाथ महाराज मंदिर हातरुण येथे भेट देऊन श्री. सोपीनाथ महाराज भाटे सेवा समितीचे पदाधिकारी आणि भविकांशी संवाद साधला. यावेळी उरळ ठाणेदार पंकज कांबळे यांचा श्री. सोपीनाथ महाराज भाटे सेवा समितीकडून जेष्ठ नागरिक श्रावण भारसाकळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्यात येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्री. सोपीनाथ महाराज मंदिरात नागपंचमी उत्सवानिमित्त रोज सकाळी श्री. नवकुळी शेषनाग देवतांची महापूजा सर्व भाटे बंधू यांच्या हस्ते करण्यात येते. देवाची आरती झाल्यानंतर नागदेवतेला नैवेद्य अर्पण करण्यात येतो. श्री. सोपीनाथ महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरावर गर्दी केली होती. यावेळी श्री. सोपीनाथ महाराज भाटे सेवा समितीचे पदाधिकारी आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What's Your Reaction?






