तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाचा १२५ वर्षांचा महोत्सव:८ ते १० ऑगस्टला विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रवेश विनामूल्य
पुणे येथील मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) वर्षानिमित्त भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करत आहे. हा महोत्सव ८ ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते ८ ऑगस्टला होणार आहे. पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध दिग्दर्शक अशोक हांडे यांच्या संकल्पनेतून 'मराठी बाणा' हा ७० एमएम मराठी कार्यक्रम सादर होणार आहे. याच दिवशी पुण्याच्या गणेशोत्सवातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. ९ ऑगस्टला संगीत क्षेत्रातील दिग्गज ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि ज्येष्ठ गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 'अमृतस्वर' हा संगीत कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आणि गायिका शैला दातार यांना सन्मानित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाचा समारोप १० ऑगस्टला 'द फोक आख्यान' या लोककलांच्या कार्यक्रमाने होणार आहे. यावेळी तुळशीबागेतील ज्येष्ठ व्यापाऱ्यांना 'तुळशीबाग व्यापार भूषण पुरस्कार' देऊन गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार हेमंत रासने, सामाजिक कार्यकर्त्या शोभा धारिवाल आणि उद्योजक पुनीत बालन उपस्थित राहणार आहेत. श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत या महोत्सवाची माहिती दिली. या परिषदेला मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, उपाध्यक्ष विनायक कदम आणि संवाद पुणेचे सुनील महाजन उपस्थित होते. सर्व कार्यक्रमांसाठी प्रवेश विनामूल्य असून पुणेकर रसिकांनी महोत्सवाला उपस्थित राहून कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

What's Your Reaction?






