मालमत्ता कराच्या विरोधात अकोट नगर परिषदेवर ‘प्रहार’चे आंदोलन:नगर पालिकेच्या इमारतीवर लटकवली प्रतिकात्मक खुर्ची, समर्थकांचा सहभाग
मालमत्ता कर विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनाने न. प. परिसर दणाणला होता. अवास्तव टॅक्स विरोधात शेकडोचा जमाव मंगळवारी नगर परिषदेवर धडकला. या वेळी शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.अवास्तव करा विरोधात शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे. जवळपास सर्वच मालमत्ता धारकांनी या कराबाबत हरकती दाखल केल्या असून, आपला विरोध देखील दर्शवला आहे. शहरातील सर्वच राजकीय पक्षांना अवास्तव टॅक्सच्या रूपाने आयता मुद्दा मिळाला असून, शहरातील काँग्रेस, सेना(उबाठा), राष्ट्रवादी यांनी आंदोलने देखील केली आहे. यामध्ये मंगळवारी प्रहार जनशक्ती पक्ष देखील सहभागी झाला असून, ‘प्रहार’च्या वतीने आंदोलन अकोट परिषदेवर करण्यात आले.यावेळी प्रतिकात्मकरित्या नगर परिषदेच्या इमारतीवर खूर्ची लटकविण्यात आल्याने वातावरण काहिसे तणावाचे होताना दिसले. मोठा जमाव न. प. च्या परिसरात गोळा झाला होता. यावेळी शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळाला. अनेक कार्यकर्ते न. प.च्या प्रवेशद्वारातून निवेदन देण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षाकडे धाव घेणार होते.अशावेळी लोकांना निवेदन देण्यासाठी प्रवेश दिला होता. निवेदनात नमूद केल्यानुसार अवाजवी टॅक्स कमी करावा, कर योग्य मूल्य आधारित (भाडे मूल्य दर) आकारणी करावी, करनिर्धारण अधिकारी आशिष वानखेडे यांनी निर्धारीत केलेले दर लागू करावे, हरकती आणि आक्षेप यांची मुदत वाढवावी, झालेला सर्वेमध्ये झोन १ व २ मध्ये टाकलेल्या मालमत्ता ह्या ३ व ४ झोनच्या आहेत, थकित टॅक्सचा भरणा अनिवार्य न करता हरकतीचे अर्ज कोणतेही अटी व शर्ती न लावता स्वीकारण्यात यावे, दलित वस्ती व झोपडपट्टी भागातील टॅक्स कमी करावा. महानगरात जे दर आकारले आहेत ते दर अकोट करीता लावणे योग्य नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देते वेळी प्रहार युवा जिल्हाध्यक्ष सुशील पुंडकर, प्रहार पक्ष जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू, संजय गवारगुरु, ज्ञानेश्वर दहिभात, गणेश गावंडे, अवि घायसुंदर, जिवन खवले, विशाल भगत, अचल बेलसर, यांच्यासह कार्यकर्ते यावेळी हजर होते. न. प. परिसरात यावेळी शहर पोलिस निरिक्षक अमोल माळवे यांच्या नेतृत्वाखाली बंदोबस्त होता.

What's Your Reaction?






